विजय हजारे करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांसाठीचं वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलेलं आहे. मुंबई, महाराष्ट्र, बडोदा, सौराष्ट्र, आंध्र प्रदेश, दिल्ली, हैदराबाद आणि कर्नाटक या ८ संघांना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. मात्र या स्पर्धेकडे मुंबईच्या अजिंक्य रहाणेने पाठ फिरवणं पसंत केलं आहे. अजिंक्य रहाणेच्या महाराष्ट्राविरुद्ध सामन्यासाठी मुंबईच्या संघात समावेश करण्यात आलेला नाहीये.

वन-डे मालिका आटोपल्यानंतर अजिंक्यचा टी-२० संघात समावेश नव्हता. यावेळी अजिंक्य रहाणेने अजित आगरकर याच्या अध्यक्षतेखालील निवड समितीला विश्रांतीची मागणी केली होती. निवड समितीनेही अजिंक्यची ही मागणी मान्य करत त्याला महाराष्ट्राविरुद्ध सामन्यात संघात जागा दिलेली नाहीये. मात्र वन-डे मालिकेत मधल्या फळीत संधी मिळालेल्या श्रेयस अय्यरला मुंबईच्या संघात जागा मिळालेली आहे.

दुसरीकडे भारताचा अनुभवी फलंदाज गौतम गंभीरनेही दिल्लीच्या संघाकडून पुनरागमन केलं आहे. पायाच्या दुखापतीमुळे गौतम साखळी फेरीतले काही सामने खेळू शकला नव्हता. मात्र ही दुखापत आता बरी झाल्याने आंध्र प्रदेशिवरुद्धच्या सामन्यात गौतमला संघात स्थान देण्यात आलं आहे. बडोद्याच्या संघानेही संघात बदल करत युसूफ पठाणला वगळण्याचा निर्णय घेतला आहे. युसूफच्या जागी अक्षय ब्रम्हभट्ट या तरुण खेळाडूला संघात जागा देण्यात आली आहे.

स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांचं वेळापत्रक –

पहिला सामना, २१ फेब्रुवारी – हैदराबाद विरुद्ध कर्नाटक

दुसरा सामना, २१ फेब्रुवारी – मुंबई विरुद्ध महाराष्ट्र

तिसरा सामना, २२ फेब्रुवारी – बडोदा विरुद्ध सौराष्ट्र

चौथा सामना, २२ फेब्रुवारी – आंध्र प्रदेश विरुद्ध दिल्ली

Story img Loader