यंदाच्या हंगामात आपल्या फलंदाजीने धावांचा रतीब घालणारा कर्नाटकचा सलामीवीर मयांक अग्रवालने, विजय हजारे करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीतही आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. मयांकच्या आक्रमक ९० धावांच्या खेळीमुळे अंतिम फेरीत कर्नाटकने सौराष्ट्रावर ४१ धावांनी मात करत विजय हजारे करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. यादरम्यान कर्नाटकच्या गोलंदाजीची धुरा वाहणाऱ्या ३३ वर्षीय श्रीनाथ अरविंदनेही अ श्रेणीच्या सामन्यांतून आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
कर्नाटकने दिलेलं २५४ धावांचं आव्हान सौराष्ट्राच्या संघाला पेलवलं नाही. पहिल्या ३ षटकांतच सौराष्ट्राचे २ गडी अवघ्या १५ धावा करत माघारी परतले. यानंतरही ठराविक अंतराने सौराष्ट्राचे फलंदाज विकेट फेकत गेल्यामुळे कर्नाटकच्या गोलंदाजांना या सामन्यात फारसा संघर्ष करावा लागला नाही. कर्णधार चेतेश्वर पुजाराच्या ९४ धावांचा अपवाद वगळता सौराष्ट्राचा एकही फलंदाज कर्नाटकच्या गोलंदाजांसमोर तग धरु शकला नाही.
कर्नाटककडून प्रसिध गौतम आणि कृष्णप्पा गौतम यांनी प्रत्येकी ३-३ बळी टिपले. याआधी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्नाटकच्या संघाची सुरुवातही अडखळती झालेली होती. करुण नायर आणि लोकेश राहुल हे दोन फलंदाज भोपळाही न फोडता माघारी परतले होते. मात्र रविकुमार समर्थ आणि मयांक अग्रवाल यांनी भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर कर्नाटकच्या डावाची पुन्हा एखदा घसरगुंडी उडाली. मात्र मधल्या फळीतल्या पवन देशपांडेने तळातल्या फलंदाजांना सोबत घेऊन कर्नाटकला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली. सौराष्ट्राकडून कमलेश मकवानाने ४ तर प्रेरक मंकडने २ बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक : कर्नाटक २५३/१०, (मयांक अग्रवाल ९०, पवन देशपांडे ४९. कमलेश मकवाना ४/३२) विरुद्ध सौराष्ट्र २१२/१० (चेतेश्वर पुजारा ९४, कृष्णप्पा गौतम ३/२७) निकाल : कर्नाटक ४१ धावांनी विजयी