विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबईच्या संघाची सुरुवात खराब झालेली आहे. नवख्या छत्तीसगड संघाने मुंबईवर अटीतटीच्या सामन्यात ५ गडी राखून मात केली. फलंदाजांनी आश्वासक कामगिरी करुनही गोलंदाजांनी केलेल्याी स्वैर माऱ्यामुळे मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईने विजयासाठी दिलेलं ३१८ धावांचं आव्हान छत्तीसगडने अमनदीप खरेच्या नाबाद शतकी खेळाच्या जोरावर पहिल्या विजयाची नोंद केली.

नाणेफेक जिंकत छत्तीसगडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जय बिस्ता आणि आदित्य तरे या मुंबईच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. शशांक सिंहने जय बिस्ताला माघारी धाडत मुंबईला पहिला धक्का दिला. मात्र यानंतर मुंबईच्या प्रत्येक फलंदाजांने छत्तीसगडच्या गोलंदाजांची पिसं काढली. आदित्य तरे, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव यांनी फटकेबाजी करत मुंबईला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. आदित्य तरेने मुंबईकडून सर्वाधिक ९० धावा केल्या, त्याला सूर्यकुमार यादवने ८१ धावा करत चांगली साथ दिली. कर्णधार श्रेयस अय्यरनेही ५० धावा केल्या.

डोंगराएवढं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या छत्तीसगडच्या संघाची सुरुवात खराब झाली. शशांक चंद्रशेखर धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर जिवनज्योत सिंह आणि आशुतोष सिंह यांनी छोटेखानी भागीदारी करत छत्तीसगडचा डाव सावरला. शम्स मुलानीने दोन्ही फलंदाजांना माघारी धाडत छत्तीसगडला धक्के दिले. मात्र यानंतर मैदानात आलेल्या अमनदीप खरेने मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत छत्तीसगडच्या विजयाचा पाया रचला. त्याला शशांक सिंह आणि अजय मंडलने चांगली साथ दिली. खरेने ९४ चेंडूत ११७ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ८ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.

मुंबईकडून धवल कुलकर्णी, शिवम दुबे आणि तुषार देशपांडे यांनी प्रचंड स्वैर मारा केला. मुंबईकडून शम्स मुलानीने २ बळी घेत चांगली झुंज दिली. मात्र अखेरीस छत्तीसगडने ५ गडी राखून बाजी मारत मुंबईला धक्का दिला.

Story img Loader