अलूर : तुषार देशपांडे (१९ धावांत ३ बळी), अथर्व अंकोलेकर (१३ धावांत २ बळी) आणि मोहित अवस्थी (९ धावांत २ बळी) यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर मुंबईने गुरुवारी विजय हजारे चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील आपल्या सलामीच्या लढतीत सिक्कीमवर सात गडी राखून मात केली.या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या सिक्कीम संघाच्या फलंदाजांचा मुंबईच्या गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. सिक्कीमचा डाव ३८.१ षटकांत ८९ धावांवर संपुष्टात आला. कर्णधार नीलेश लामिचाने (२९) व सलामीवीर पंकज रावत (१४) वगळता कोणालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही.
मुंबई संघाने हे माफक आव्हान १२ षटकांत ३ बाद ९० धावा करत पूर्ण केले. मुंबईकडून सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी (३०), जय बिस्ता (२८) आणि प्रसाद पवार (१४) हे चांगल्या सुरुवातीनंतर बाद झाले. कर्णधार अजिंक्य रहाणे (नाबाद १५) व सर्फराज खान (नाबाद २) यांनी मुंबईचा विजय सुनिश्चित केला. सिक्कीमकडून सुमित सिंहने (२/२७) चांगली गोलंदाजी केली.हरियाणाच्या विजयात चहलची चमक गेल्या काही काळापासून भारतीय संघातून बाहेर असलेला अनुभवी लेग-स्पिनर यजुवेंद्र चहलच्या (२६ धावांत ६ बळी) प्रभावी माऱ्यानंतर युवराज सिंगने (६८) झळकावलेल्या अर्धशतकाच्या बळावर हरियाणाने उत्तराखंडवर सहा गडी राखून विजय मिळवला. उत्तराखंडने आदित्य तरेच्या (६५) खेळीमुळे २०७ धावांपर्यंत मजल मारली. हरियाणाने ४५ षटकांत ४ बाद २०८ धावा करत हे आव्हान पूर्ण केले.
हेही वाचा >>>शतकांची कला रोहितला अवगत! विश्वचषकातील खेळण्याची शैली योग्यच; अश्विनकडून भारतीय कर्णधाराची पाठराखण
झारखंडकडून महाराष्ट्र पराभूत
विराट सिंगच्या (१४३) आक्रमक शतकाच्या जोरावर झारखंडने महाराष्ट्र संघावर सहा गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने अंकित बावणेच्या (नाबाद १०७) शतकाच्या बळावर ४ बाद ३५५ धावा केल्या. मात्र, विराटला सौरभ तिवारी (नाबाद ७०), कुमार कुशाग्र (नाबाद ६७) व विनायक विक्रम (५३) यांनी दिलेल्या साथीमुळे झारखंडने ४८ षटकांत ४ बाद ३५९ धावा करत विजय साकारला.