Vijay Hazare Trophy 2025 Abhishek Sharma century : एकीकडे भारतीय संघ ऑस्ट्रेलियात संघर्ष करत आहे आणि बीसीसीआय रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या फलंदाजांच्या बदलीच्या शोधात आहे, तर दुसरीकडे काही तरुणांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यापैकीच एक म्हणजे अभिषेक शर्मा. पंजाब आणि सौराष्ट्र यांच्यातील विजय हजारे करंडक फेरीच्या पाचव्या सामन्यात अभिषेक शर्माने वादळी दीडशतक झळकावून सर्वांना चकित केले आहे. त्याच्या आणि प्रभसिमरन सिंगच्या दमदार शतकांच्या जोरावर पंजाबने ५ गड्यांच्या मोबदल्यात ४२४ धावा केल्या.
अहमदाबादच्या गुजरात कॉलेज मैदानावर नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर पंजाब संघाने ३१ षटकांत २९८ धावा केल्या. संघासाठी कर्णधार अभिषेक शर्माने स्फोटक फलंदाजी केली आणि दुसऱ्या बाजून प्रभसिमरन सिंगनेही शानदार साथ दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी २९८ धावा केल्या. विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्या विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी आहे. यादरम्यान टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिषेक शर्माने तुफान फटकेबाजी केली. त्याने ९६ चेंडूत २२ चौकार आणि ८ षटकार ठोकले.
अभिषेक शर्माचे वादळी शतक –
प्रभसिमरन सिंगने ९५ चेंडूंचा सामना करताना ११ चौकार आणि ८ षटकार मारले. त्याने १२५ धावा केल्या. यानंतर अखेरच्या सामन्यात अनमोल मल्होत्राने ४५ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ४८ धावा केल्या तर सनवीर सिंगने २९ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद ४० धावांची खेळी केली. अभिषेक शर्मा ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे त्यावरून असे दिसते की तो लवकरच भारताकडून वनडे आणि कसोटी या दोन्ही सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे.
१९ वर्षांखालील विश्वविजेत्या संघाचा राहिलाय सदस्य –
१९ वर्षाखालील विश्वचषक २०१८ मध्ये अभिषेक शर्मा शुबमन गिल आणि पृथ्वी शॉसोबत खेळला. या हंगामात, राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली, संघाने विश्वविजेते होण्याचा मान मिळवला होता, तर पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल यांनी यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यावर्षी आयपीएलमधील धमाकेदार कामगिरीच्या जोरावर अभिषेकने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पदार्पण केले.