उदयोन्मुख फलंदाज आणि कर्णधार ऋतुराज गायकडवाने (१३२ चेंडूंत १६८ धावा) मंगळवारी गेल्या पाच सामन्यांतील चौथे शतक झळकावले. परंतु त्याच्या दीड शतकी खेळीनंतरही महाराष्ट्राला विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयश आले.

मंगळवारी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेल्या ड-गटातील अखेरच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने चंडीगडचा ५ गडी आणि सात चेंडू राखून सहज पराभव केला. ऋतुराजचे दीड शतक आणि अझीम काझीच्या नाबाद ७३ धावांमुळे चंडीगडने दिलेले ३१० धावांचे लक्ष्य महाराष्ट्राने ४८.५ षटकांत गाठले. पाच लढतींत चार विजय मिळवणाऱ्या महाराष्ट्राला गटात तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. केरळ आणि मध्य प्रदेश या संघांनी महाराष्ट्राइतकेच गुण कमावले. मात्र सरस धावगतीच्या बळावर त्यांनी उपउपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले.

प्रथम फलंदाजी करताना कर्णधार मनन वोहरा (१४१) आणि अर्सलन खान (८७) यांच्या फटकेबाजीमुळे चंडीगडने ७ बाद ३०९ धावांपर्यंत मजल मारली. ऋतुराजने मात्र आणखी एका लढतीत शतकी नजराणा पेश करताना आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघातील स्थानासाठी दावेदारी पेश केली आहे.

संक्षिप्त धावफलक

चंडीगड : ५० षटकांत ७ बाद ३०९ (मनन वोहरा १४१, अर्सलन खान ८७; प्रदीप दाढे ४/४९) पराभूत वि. महाराष्ट्र : ४८.५ षटकांत ५ बाद ३१३ (ऋतुराज गायकवाड १६८, अझीम काझी नाबाद ७३; अर्पित पन्नू २/४१)