नवी दिल्ली : विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा १२ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत मुंबईसह बेंगळूरु, दिल्ली, कोलकाता, रांची येथे आयोजित करण्यात येणार आहे. २०२० नंतर यंदा प्रथमच ‘बीसीसीआय’तर्फे देशांतर्गत क्रिकेट हंगामातील सर्व स्पर्धा रीतसर होणार आहेत.
यंदाच्या हंगामाचा प्रारंभ दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेने होणार असून, ८ ते २५ सप्टेंबर या दरम्यान ही स्पर्धा होईल. प्रतिष्ठेची रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा परंपरागत पद्धतीने १२ डिसेंबर २०२२ ते २० फेब्रुवारी २०२३ या कालावधीत होईल. प्रत्येक संघाला फक्त तीन साखळी सामने खेळायला मिळणार आहेत.
सय्यद मुश्ताक अली करंडक (ट्वेन्टी-२०) आणि विजय हजारे करंडक या दोन स्पर्धाच्या बाद फेरीचे सामने अनुक्रमे कोलकाता आणि अहमदाबाद येथे होणार आहेत. मुश्ताक अली स्पर्धेचे साखळी सामने लखनऊ, इंदूर, राजकोट, पंजाब आणि जयपूर येथे होतील.
यंदा १५ वर्षांखालील मुलींसाठी २६ डिसेंबर २०२२ ते १२ जानेवारी २०२३ या कालावधीत सामने होतील.
दोन इराणी करंडक सामने
यंदाच्या हंगामात इराणी करंडकाच्या दोन लढती आयोजित करण्यात येणार आहेत. यातील एक लढत हंगामाच्या सुरुवातीला आणि एक हंगामाअखेरीस होईल. २०२०चे रणजी विजेता सौराष्ट्रचा संघ १ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत, तर सध्याचा रणजी विजेता मध्य प्रदेशचा संघ पुढील वर्षी १ ते ५ मार्च या दरम्यान शेष भारताशी सामना करील. मार्च २०२०मध्ये प्रथमच रणजी करंडक जिंकल्यानंतर सौराष्ट्रचा संघ करोना साथीच्या उद्रेकामुळे इराणी करंडकाचा सामना खेळू शकला नव्हता.