Vijay Hazare Trophy Mumbai vs Arunachal Pradesh: विजय हजारे ट्रॉफीच्या या मोसमाच्या तिसऱ्या टप्प्यातही मुंबई संघ उत्कृष्ट कामगिरी करत आहे. मुंबई संघाने कर्णधार बदलला असतानाही अरुणाचल प्रदेशविरूद्धच्या सामन्यात एकतर्फी विजय नोंदवला. या सामन्यात श्रेयस अय्यरच्या जागी मुंबईचे नेतृत्व शार्दुल ठाकूरकडे होते. या सामन्यात श्रेयस अय्यर खेळला नाही आणि शार्दुलच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या गोलंदाजांनी विरोधी संघाला केवळ ७३ धावांत गुंडाळले आणि त्यानंतर ३३ चेंडूत ७७ धावा करून सामना ९ विकेटने सहज सामना जिंकला.
मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पहिल्या डावात अरुणाचल प्रदेशचा संघ ३२.२ षटकांत ७३ धावांवर गारद झाला. अरूणाचल संघाचा एकही फलंदाज मैदानावर फार काळ टिकू शकला नाही.
मुंबईला विजयासाठी ७४ धावांचे सोपे लक्ष्य होते आणि मुंबईने ५.३ षटकांत म्हणजे ३३ चेंडूत एक गडी गमावून ७७ धावा केल्या आणि सामना जिंकला. मुंबईचा हा सलग दुसरा विजय ठरला. तीन सामन्यांत मुंबईने आतापर्यंत एक सामना गमावला आहे तर दोन सामने जिंकले आहेत.
अरूणाचल प्रदेशविरूद्धच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली आणि अरुणाचल प्रदेशचे फलंदाज पूर्णपणे बॅकफूटवर दिसले. मुंबईकडून कर्णधार शार्दुल ठाकूर, हर्ष तन्ना, हिमांशू सिंग आणि अथर्व अंकोलकर यांनी प्रत्येकी २ तर रेस्टन डायस आणि श्रेयांश शेडगे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा – Virat Kohli Fined: विराट कोहलीवर ICC ने केली कारवाई, सॅम कोन्स्टासबरोबर वाद घालणं पडलं भारी
अरुणाचल प्रदेशसाठी खालच्या फळीतील फलंदाज याब नियाने १७ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली तर तेची डोरियाने १३ धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला १० धावांचा आकडाही गाठता आला नाही आणि संपूर्ण संघ ३२.२ षटकांत ७३ धावा करत गारद झाला.
मुंबईला विजयासाठी सोपे लक्ष्य मिळाले होते आणि या संघाचा सलामीवीर फलंदाज अंगक्रिश रघुवंशी याने अवघ्या १८ चेंडूत ५० धावांची नाबाद खेळी केली आणि यादरम्यान त्याने एक षटकार आणि ९ चौकार लगावत विस्फोटक फलंदाजी केली.तर दुसरा सलामीवीर फलंदाज आयुष महात्रे याने ११ चेंडूत १५ धावा केल्या. याशिवाय हार्दिक तामोरेने ४ चेंडूत नाबाद ७ धावा केल्या आणि त्याने आंगक्रिशच्या साथीने सामना सहज जिंकला. त्याच्या या शानदार खेळीसाठी अंगक्रिश रघुवंशी याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.