वेस्ट इंडिजमधील सामान्य नागरिक दररोजचा नाश्ता, भोजन आदी गोष्टींकरिता शंभर डॉलरपेक्षा जास्त रक्कम खर्च करीत असेल. मात्र शंभर डॉलर्स या माफक रकमेत आपण कॅरेबियन प्रीमिअर क्रिकेट लीगमधील बार्बाडोस ट्रायडेन्ट्स फ्रँचाइजी विकत घेतल्याची मुक्ताफळे उद्योगपती विजय मल्याने उधळली आहेत.
किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या नऊ हजार कोटी रुपयांच्या कर्जाच्या वसुलीकरिता मल्या याच्यामागे विविध बँकांनी तगादा लावला आहे. मल्याने कॅरेबियन लीगमधील ट्रायडेण्ट्स ही फ्रँचाइजी खूप मोठी रक्कम देत विकत घेतली असल्याचे सांगितले जात होते. त्यावर प्रतिक्रिया देताना मल्याने आपण अन्य मित्रांच्या मदतीने अवघ्या शंभर अमेरिकन डॉलर्स खर्च करीत हा संघ विकत घेतल्याचे म्हटले आहे. त्याने युनायटेड स्पिरिट्स कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या आयपीएल संघावरील नियंत्रणही गमावले. त्यानंतर त्याने ट्रायडेण्ट्स हा संघ विकत घेतला.
मल्याने सांगितले की, ‘जरी मी शंभर डॉलर्समध्ये हा संघ विकत घेतला असला तरी हा संघ चालविण्यासाठी दोन दशलक्ष डॉलर्स खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे मी बार्बाडोस येथील स्थानिक शासनाच्या प्रतिनिधींना भेटलो व त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा केली. त्यांनी मदत करण्याचे आश्वासनही दिले. तेथील शासनाने मला हा संघ चालविण्यासाठी अनेक सवलती दिल्या. सामान्य लोकांना वाटते, मला खूप स्वस्तात हा संघ मिळाला आहे. प्रत्यक्षात त्याचा दैनंदिन खर्च खूप मोठा आहे.’
आयपीएलमधील फ्रँचाइजींना जसे उत्पन्न मिळत असते, तसे उत्पन्न कॅरेबियन लीगमधील फ्रँचाइजींना मिळत नाही. त्यांना केवळ तिकीट विक्री व प्रायोजकत्वाद्वारेच उत्पन्न मिळते. भारताचा बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान यानेही कॅरेबियन लीगमध्ये एक संघ विकत घेतला असल्याचे समजते.

Story img Loader