विजय मल्ल्या हे तसे शौकिन व्यक्तिमत्त्व. आपल्या आवडीसाठी त्यांनी २००७मध्ये अमाप पैसा खर्च करून चक्क फॉम्र्युला-वन संघच विकत घेतला. मल्ल्या यांच्या किंगफिशर कंपनीची पुरती वाताहत झाली, त्यानंतर फोर्स इंडिया संघ चालवणे आणि फॉम्र्युला-वनमध्ये पैसा ओतणे कठीण होऊन बसल्यामुळे मल्ल्या यांनी सहाराचा ‘सहारा’ घेतला. असे असले तरी त्यांचा वेगाचा सोस मात्र आवरत नाही आणि फोर्स इंडियाची कामगिरीही अपेक्षेप्रमाणे होत नाही. सगळीकडूनच वाईट दिवस आलेल्या मल्ल्या यांना मात्र ‘या सुखांनो या..’ अशी साद घालत बसण्याचीच वेळ आली आहे.
फोर्स इंडियाला गेल्या चार मोसमात सांघिक अजिंक्यपद (कंस्ट्रक्टर्स चॅम्पियनशिप) शर्यतीत पहिल्या पाच जणांत स्थान पटकावता आलेले नाही. त्याचबरोबर फॉम्र्युला-वनमध्ये अद्याप पाच वर्षांत एकही शर्यत फोर्स इंडियाच्या ड्रायव्हर्सना जिंकता आलेली नाही. लोट्स, सौबेरसारखे पैशांची वानवा असलेले संघ फॉम्र्युला-वनमध्ये चांगली कामगिरी करत असताना भक्कम अर्थव्यवस्था असलेला फोर्स इंडिया संघ त्या तुलनेत बराच मागे पडत आहे. २०१३च्या मोसमाच्या सुरुवातीपासूनच फोर्स इंडिया संघाचा ‘फोर्स’ जाणवत होता. पहिल्याच शर्यतीपासून फोर्स इंडियाने धडाकेबाज कामगिरी करत प्रतिस्पर्धी दिग्गज संघांना इशारा दिला होता. या मोसमाच्या पहिल्या टप्प्यात कामगिरीत सुधारणा करत फोर्स इंडियाने तब्बल ५९ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आपली दावेदारी सिद्ध केली होती. ऑस्ट्रेलियन ग्रां. प्रि. शर्यतीत एड्रियन सुटीलने सातवे आणि पॉल डी रेस्टाने आठवे स्थान पटकावत तब्बल १० गुणांची बोहनी फोर्स इंडियाला करून दिली. बहारिन ग्रां. प्रि.मध्ये फोर्स इंडियाने सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. या शर्यतीत रेस्टाने चौथ्या क्रमांकावर झेप घेत तब्बल १२ गुण मिळवून दिले. चीन ग्रां. प्रि.मध्ये चार, स्पेनमधील शर्यतीत सहा, मोनॅको शर्यतीत १२, कॅनडा ग्रां. प्रि.मध्ये सात, ब्रिटन शर्यतीत आठ असे गुण जमा करत पहिला टप्प्यात भरीव कामगिरी केली. पहिल्या टप्प्यात फोर्स इंडियाने तब्बल ५९ गुणांची कमाई केली.
घर फिरले की घराचे वाशेही फिरतात, या म्हणीप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात फोर्स इंडियाचे भाग्यही रुसले. ब्रिटिश ग्रां. प्रि. शर्यतीपासून टायर बदलण्याचा नवा नियम अमलात आला. फॉम्र्युला-वनमधील संघांना टायर पुरविणाऱ्या पायरेली या कंपनीने नवे टायर सादर केल्यानंतर फोर्स इंडियाला दुसऱ्या टप्प्यात फक्त तीनच गुणांची कमाई करता आली. मॅकलॅरेनसारख्या बडय़ा संघाला मागे टाकून पाचव्या क्रमांकावर झेप घेण्यासाठी सज्ज असलेल्या फोर्स इंडिया संघाला आता सहाव्या क्रमांकावरच समाधान मानावे लागणार आहे.
इंडियन ग्रां. प्रि. ही फोर्स इंडियाची घरच्या मैदानावरील शर्यत. या शर्यतीत घरच्या संघाकडून नेहमीच चांगल्या कामगिरीची अपेक्षा चाहत्यांना असते. पण टायर बदलाने अडचणीत सापडलेला फोर्स इंडिया संघ आपल्या चाहत्यांना चांगल्या कामगिरीची भेट देईल का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Story img Loader