आर्थिक डबघाईचे कारण पुढे करीत किंगफिशरच्या कर्मचाऱ्यांचा पगार थकविलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांनी बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाचे मालक या नात्याने आयपीएलच्या सातव्या हंगामाच्या लिलावाच्या पहिल्या दिवशी भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला तब्बल १४ कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले. आयपीएलच्या सर्व हंगामातील ही सर्वोच्च बोली आहे.
उद्योगपती म्हणून नेहमीच वादग्रस्त राहिलेले विजय मल्ल्या आणि त्यांचे पुत्र सिद्धार्थ हे पहिल्या हंगामापासूनच आयपीएलच्या ग्लॅमरमध्ये नेहमीच चर्चेच राहिले आहेत. किंगफिशर कर्मचाऱ्यांची आंदोलने, २०१२मध्ये धनादेश न वठल्यावरून हैदराबाद न्यायालयाने बजावलेले वॉरन्ट आदी गोष्टींमुळे मल्ल्या वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मात्र तेव्हाही किंगफिशरच्या महागडय़ा कॅलेंडरपासून ते आयपीएलच्या बोलींपर्यंत त्यांचाच बोलबाला राहिला आहे. यावेळी युवराजची बोली प्रथम पंजाब आणि राजस्थान यांनी लावली, पण नंतर मल्ल्या यांनी सर्वोच्च बोली लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
मी युवराजसाठी काही कोटी जास्तच मोजले, पण तो संघात हवाच, हा कप्तान विराट कोहलीचा आग्रह मलाही मान्य होता. त्यामुळे युवीच्या संघातील येण्याने मी आनंदी आहे, अशी ट्विपण्णी मल्ल्या यांनी नंतर केली.
क्रिकेटमध्ये अधिकाधिक पैसा आणि ग्लॅमर आणणाऱ्या आयपीएलच्या सातव्या हंगामाच्या लिलावाच्या पहिल्या दिवशी कोटी कोटी उड्डाणे पाहायला मिळाली. आयपीएलच्या गेल्या हंगामात सातत्याने धावा करणाऱ्या दिनेश कार्तिकचा यंदाच्या लिलावात भाव वधारल्याचे पाहायला मिळाले, त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने १२ कोटी ५० लाख रुपयांना संघात घेतले.
सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालामुळे आयपीएलवर टीका सुरू झाली असली तरी लिलावाचा पहिला दिवस कोणत्याही अडचणींविना पार पडला. यंदाच्या लिलावात भारतीय खेळाडूंना जबरदस्त मागणी असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. युवराज आणि कार्तिक हे दोघेही भारतीय संघातील स्थान मिळवण्यासाठी धडपडत असले तरी त्यांना आयपीएलच्या लिलावात प्रचंड मागणी असल्याचे दिसून आले. ऑस्ट्रेलियाच्या नावाजलेल्या खेळाडूंबरोबर उदयोन्मुख खेळाडूंनाही लिलावात चांगली मागणी होती. तर दुसरीकडे श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलर यांच्यासाठी कुणीही बोली लावण्यात उत्सुक दिसले नाही.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा