निवडणूक संपल्यानंतर आता कुरघोडीच्या राजकारणामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) रणांगण तापले आहे. सचिन तेंडुलकरच्या कारकीर्दीतील दोनशेव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याचे शिवधनुष्य एमसीए पेलत असून, रविवारी झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीप्रसंगी बाळ म्हाडदळकर गट आणि क्रिकेट फर्स्ट यांच्यात वादाची ठिणगी पडली. अध्यक्ष शरद पवार दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवण्यावरून उपाध्यक्ष रवी सावंत आणि विजय पाटील यांच्याकडून दावेदारी करण्यात आली. एमसीएच्या घटनेनुसार वरिष्ठ उपाध्यक्ष सभेचे अध्यक्षस्थान भूषवतो, परंतु यावेळी मात्र या विषयावरून चांगलाच वाद रंगला. अखेर विजय पाटील यांच्यासहित क्रिकेट फर्स्टच्या सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
कार्यकारिणी समितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवण्यावरून झालेल्या या वादात दोन्ही गटांकडून दावे करण्यात आले. पाटील अधिक मतांनी उपाध्यक्षपदावर निवडून आले आणि रत्नाकर शेट्टी यांच्या राजीनाम्यानंतर ते कार्यकारिणीत वरिष्ठ उपाध्यक्ष होते, असा दावा पाटील गटाकडून करण्यात आला. तथापि, रवी सावंत हे माजी अध्यक्ष आहेत, बीसीसीआयचे उपाध्यक्ष आहेत आणि आमच्या गटाचे तब्बल १२ जण कार्यकारिणीत आहेत, असा दावा म्हाडदळकर गटाकडून करण्यात आला. अखेर पाटील यांनी नदीम मेमन आणि अ‍ॅबी कुरुविल्ला यांच्यासहित बैठक सोडण्याचा निर्णय घेतला.
‘‘वरिष्ठ उपाध्यक्ष आणि गेली २० वष्रे एमसीएच्या कार्यकारिणीवर कार्यरत असलेल्या रवी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठकी झाली,’’ अशी माहिती संयुक्त सचिव डॉ. पी. व्ही. शेट्टी यांनी दिली.
त्यानंतर झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत ११ नोव्हेंबरला होणारा सचिनच्या सत्काराचा कार्यक्रम आणि सचिन तेंडुलकर जिमखाना नामकरण, वानखेडेवरील कसोटी सामन्याची तयारी, बाळासाहेब ठाकरे पत्रकार कक्षाचे नामकरण आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
वानखेडे स्टेडियमवर १४ ते १८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या सचिनच्या ऐतिहासिक सामन्याची सर्वसामान्य क्रिकेटरसिकांसाठी जवळपास साडेतीन ते चार हजार तिकिटेच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या तिकिटांचे स्वरूप कसे असावे, याबाबत सध्या विचारविमिनय सुरू आहे. दोन-तीन प्रकारे तिकिटांचे नमुने तयार करण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader