महाराष्ट्राचा विजय झोल १९ वर्षांखालील संघांच्या आशिया चषकात भारताचे नेतृत्व करणार आहे. २८ डिसेंबरपासून संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा होणार आहे. अखिल भारतीय कनिष्ठ निवड समितीच्या झालेल्या बैठकीत झोलच्या कर्णधारपदावर शिक्कामोर्तब झाले.
२०११ मध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये १९ वर्षांखालील संघासाठी खेळताना जालन्याच्या विजयने ४५१ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली होती.
या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, मलेशिया हे संघ सहभागी होणार आहेत. भारताची सलामीची लढत २८ डिसेंबरला संयुक्त अरब अमिराती संघाशी होणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारताचा मुकाबला ३१ डिसेंबरला होणार आहे. ४ जानेवारीला अंतिम लढत होईल.
भारताचा १९ वर्षांखालील संघ : विजय झोल (कर्णधार), संजू सॅमसन, अखिल हेरवाडकर, अंकुश बैन्स, रिकी भुई, श्रेयस अय्यर, सर्फराझ खान, दीपक हुडा, कुलदीप यादव, आमिर गनी, करन कैला, सी. व्ही. मिलिंद, अवेश खान, रिशी आरोठे, मोनू कुमार सिंग.

Story img Loader