आंतरराष्ट्रीय बॉक्सर राम सिंग याने आपण अमली पदार्थ सेवन करत असल्याची कबुली दिल्यामुळे भारताच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरातून त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंदर सिंग याचीही पोलिसांकडून चौकशी केली जाणार असल्याचे समजते.
फत्तेहगढ साहेबचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरदयाल सिंग यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, हेरॉइनप्रकरणी पकडण्यात आलेला अनुप सिंग कहलोन याच्या अन्य सहकाऱ्यांपैकी सुनील कटियाल याला ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंत याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. कहलोन याच्या मोबाइलवरील क्रमांकांची माहिती घेताना विजेंदरने त्याला अनेक वेळा फोन केल्याचे निष्पन्न झाले आहे. राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्थेत विजेंदर व राम सिंग हे एकाच खोलीत राहत होते. राम सिंगनेही आपल्या निवेदनात विजेंदरचा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्याचीही सविस्तर चौकशी करणे आवश्यक आहे. मात्र सध्या आम्ही या प्रकरणातील मुख्य तीन-चार आरोपींवर लक्ष केंद्रित करीत आहोत.
राष्ट्रीय क्रीडा संस्थेचे कार्यकारी संचालक एल. एस. राणावत यांनी राम सिंगला शिबिरातून डच्चू देण्यात आल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, फतेहगढ साहेब जिल्ह्य़ातील अमली पदार्थप्रकरणी राम सिंग याची कसून चौकशी करण्यात आली. त्याने आपण हेरॉइन आदी उत्तेजक घेत असल्याचे मान्य केले आहे. सोमवारी त्याला शिबिरातून अधिकृतरीत्या डच्चू दिला जाईल. राम सिंग याचे नाव शिबिरार्थीच्या यादीत नव्हते, मात्र विजेंदर सिंग याने शिफारस केल्यानंतर त्याचा राष्ट्रीय शिबिरात समावेश करण्यात आला.
हेरॉइनप्रकरणी पकडण्यात आलेला अनुप सिंग कहलोन याच्याकडूनच आपण अमली पदार्थ विकत घेत असल्याचे राम सिंगने पोलिसांच्या चौकशीत सांगितले. गतवर्षी कहलोन याने त्याला दोन ग्रॅम हेरॉइन दिले होते. हे जेव्हा विजेंदर सिंगला कळले तेव्हा त्याने आपला निषेध केला होता व विरोधही केला होता, असे राम सिंगने सांगितले. तो पुढे म्हणाला, आम्ही दोघांनी उत्तेजक पदार्थ म्हणून एक-दोन वेळा अमली पदार्थाचे सेवन केले होते. अमली पदार्थाचे सेवन केल्यानंतर आम्ही कोणत्याही स्पर्धेत भाग घेतलेला नाही. त्यावेळी ही बंदी घातलेली औषधे होती, याची आपल्याला कल्पना नव्हती.
हेरॉइन प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे विजेंदरने म्हटले होते. आपला सहकारी खेळाडूही त्यात असेल याची आपल्याला कल्पना नव्हती, असेही त्याने म्हटले आहे.
पंजाब पोलिसांनी हेरॉइन संदर्भात अर्जुन पुरस्कार विजेते ज्येष्ठ मल्ल जगदीशसिंग भोला यांच्या एका नातेवाईकाच्या कारखान्यावर छापा टाकला असल्याचे समजते. भोला यांचेही कहलोन याच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, भोला हे फरारी झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.
विजेंदरची उत्तेजक चाचणी होणार नाही
राम सिंग याने विजेंदर हा उत्तेजक घेत असल्याचे जरी सांगितले असले तरी विजेंदर याची राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीकडून (नाडा) उत्तेजक चाचणी होण्याची शक्यता कमी आहे. नाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, विजेंदर प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असल्यामुळे आमच्या समितीकडून त्यामध्ये हस्तक्षेप होणार नाही. त्याची नाकरे चाचणी घ्यावयाची की नाही याचा निर्णय पोलिसांनी घ्यावयाचा आहे. हेरॉईन सेवन हे उत्तेजक प्रतिबंधकाच्या कायद्याखाली येत नाही. फक्त स्पर्धेनिमित्तानेच आम्ही उत्तेजक चाचणी घेऊ शकतो.