केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिची पद्मभूषण सन्मानासाठी शिफारस केल्यानंतर ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बॉक्सर विजेंदरसिंग हा देखील या सन्मानासाठी आपले नशीब आजमावत आहे.
विजेंदर म्हणाला, हा पुरस्कार मिळावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे मात्र माझा अर्ज फेटाळला तरी मला फारसे दु:ख वाटणार नाही. माझ्यापेक्षाही दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळविणारा मल्ल सुशीलकुमार याला हा मान मिळाला तर मला खूप आनंद होईल. कारण त्याने ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य व एक कांस्यपदक जिंकले आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे. २०१० मध्ये मला पद्मश्री सन्मान मिळाला, त्याच वर्षी सायना हिलादेखील हा मान मिळाला होता.
जर आमच्या दोघांची तुलना केली तर आमची कामगिरी समान आहे असेच मी सांगेन. २००८ मध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकल्यानंतर मी जागतिक स्पर्धेतही कांस्यपदक मिळविले होते. पाठोपाठ मी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य व जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे.
विजेंदरने बॉक्सिंग इंडियास आपले नाव पद्मभूषण सन्मानासाठी शिफारस करण्याची विनंती केली होती. मात्र केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा याबाबतचा निर्णय अंतिम मानला जात आहे. त्यांनी किती खेळाडूंची शिफारस केली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा