ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंग हेरॉईन प्रकरणात अडकणार, अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती. पण विजेंदरच्या उत्तेजक चाचणीच्या अहवालात त्याने कोणतेही प्रतिबंधित उत्तेजक द्रव्य पदार्थाचे सेवन केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विजेंदरची या प्रकरणातून सहीसलामत सुटका होण्याची शक्यता वाढली आहे.
‘‘विजेंदरचे रक्त आणि लघवीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. पण त्याने कोणतेही उत्तेजक नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
विजेंदरसहित त्याच्या चार सहकारी बॉक्सर्सच्या चाचणीतही काही आढळले नाही,’’ असे क्रीडा मंत्रालयाकडून सांगण्यात आले. विजेंदरबाबतीतचे सत्य समोर येण्यासाठी क्रीडा मंत्रालयाच्या विनंतीनंतर राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) ही चाचणी घेतली होती.
पंजाबमध्ये घडलेल्या हेरॉईन प्रकरणात विजेंदरचा सहभाग असल्याचा दावा पंजाब पोलिसांनी केला होती. विजेंदरने १२ वेळा हेरॉईनचे सेवन केले आहे, असे पंजाब पोलिसांनी चौकशीनंतर म्हटले होते. विजेंदरचा साथीदार राम सिंग यानेही आपण विजेंदरसह उत्सुकता म्हणून हेरॉईन सेवन केले होते, असे पंजाब पोलिसांना सांगितले होते. पण या प्रकरणात आपला कोणताही सहभाग नसल्याची भूमिका विजेंदरने सुरुवातीपासूनच घेतली होती.
आपले रक्त आणि लघवीचे नमुने देण्यासही त्याने नकार दिला होता. पण या प्रकरणातून निर्दोष मुक्तता होण्यासाठी नंतर विजेंदरने रक्त आणि लघवीचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आल्याने विजेंदरवर ओढवलेले संकट दूर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Story img Loader