आपल्या आजूबाजूला अनेक वाईट गोष्टी घडत असतात. पण एखाद्याच्या संगतीत राहून वाईट गोष्टीची सवय लागली की मन कायम त्याच गोष्टींच्या मागे धावू लागते. पैसा, प्रसिद्धी, सेलिब्रेटी दर्जा अशा अनेक गोष्टी पायाशी लोळण घालत असल्या तरी वाईट सवयी कधीही पिच्छा सोडत नाहीत. वाईट सवयींमुळे आपली कारकीर्द संपुष्टात येईल, याची जराशी भीतीसुद्धा नसते. विजेंदर सिंगच्या बाबतीत असेच घडत आहे. अमली पदार्थाची तस्करी करता-करता विजेंदर हळूच या नशेच्या आहारी गेला, असे आरोप सध्या त्याच्यावर होत आहेत. त्यामुळे भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या या बॉक्सरची कारकीर्द धूळीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोणत्याही खेळाडूला पैसा, प्रसिद्धी, सेलिब्रेटी दर्जा, नावलौकिक सहजपणे मिळत नाहीत. त्यामागे अनेक वर्षांची कठोर तपश्चर्या कारणीभूत असते. विजेंदरनेही कठोर परिश्रमांच्या जोरावर बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावून ह्या सर्व गोष्टी मिळवल्या. एका रात्रीत तो स्टार, आदर्श खेळाडू ठरला. हरयाणा, पंजाबमधील अनेक तरुण विजेंदरची कामगिरी आणि त्याला मिळालेला सेलिब्रेटी दर्जा पाहून बॉक्सिंगकडे वळले. पण गेल्या काही आठवडय़ांपासून विजेंदर वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आहे. विजेंदरचा सहकारी राम सिंग याचा मित्र अनुप सिंग कहलोन याच्याकडून पंजाब पोलिसांनी १३० कोटी रुपयांचे २६ किलो हेरॉईन जप्त केले. त्याठिकाणी विजेंदरच्या पत्नीची कार आढळून आली होती. त्याचबरोबर आपण उत्सुकता म्हणून विजेंदरसह हेरॉईन घेतल्याचा गौप्यस्फोट राम सिंगने केला होता. आता पंजाब पोलिसांनी चौकशीअंती विजेंदरने १२ वेळा हेराईनचे सेवन केल्याचा खुलासा करून खळबळ उडवून दिली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी ठरलेल्या विजेंदरने असे का करावे. तसेच यश, प्रसिद्धी, पैसा हे सर्व काही असताना विजेंदरला हे करण्याची गरज का भासली, हाच प्रश्न सर्वाना भेडसावत आहे. हरयाणा आणि पंजाबमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. हेरॉईन, चरस, गांजासारखे नशा आणणारे पदार्थ तेथे सहज उपलब्ध होतात. तसेच घडणाऱ्या १० गुन्ह्यांपैकी तीन-चार गुन्ह्यांमध्ये बॉक्सर्सचा समावेश असतो, हे भयावह वास्तवही समोर आले आहे. विजेंदर सराव करत असलेल्या पतियाळामधील राष्ट्रीय क्रीडा इन्स्टिटय़ूटच्या आवारात जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने (वाडा) बंदी घातलेली उत्तेजके तसेच अमली पदार्थ सहजपणे मिळतात, हेही उघड झाले आहे. सराव झाल्यानंतर खेळाडू आपल्या खोल्यांमध्ये काय करतात, यावर देखरेख असणारी कोणतीही यंत्रणा येथे उपलब्ध नाही. त्यामुळे कित्येक महिने पतियाळात सराव करणारे खेळाडू पुरेशा ज्ञानाअभावी अशा वाईट गोष्टींकडे प्रवृत्त होण्याची भीती जास्त असते. अमली पदार्थ घेतल्यानंतर काय वाटते, या उत्सुकतेपोटी राम सिंगसह विजेंदरनेही हेरॉईनचे सेवन केले आणि त्याची सवयच त्याला जडली, असे दिसून येते. हेरॉईन घेतल्याच्या काळात विजेंदर कोणत्याही स्पर्धेत सहभागी झाला नाही, अन्यथा त्याची चोरी कधीच उघडकीस आली असती. अमली पदार्थाच्या तस्करीत विजेंदरचा सहभाग असल्याचे पुरावे नसले तरी मोबाईल फोनच्या माहितीच्या आधारे विजेंदर कोणत्या भागात होता, याचा तपास पोलिस घेत आहेत. विजेंदरने स्वत:चे लघवी, केस आणि रक्ताचे नमुने राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेला तपासासाठी देऊन आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी पाऊल उचलले आहे.
२००९मध्ये अमेरिकेचा जलतरणपटू मायकेल फेल्प्सवर ‘मारिजुआना’ धूम्रपान केल्याप्रकरणी तीन महिने बंदी घातली गेली होती. विख्यात टेनिसपटू आंद्रे आगास्सी यानेही आपण १९९७मध्ये उत्तेजक घेतल्याचे आपल्या आत्मचरित्रात म्हटले होते. पण आपल्या पेयामध्ये कुणीतरी उत्तेजक मिसळले असावे, असे स्पष्टीकरण देत आगास्सीने बंदीच्या शिक्षेतून सुटका करून घेतली होती. पाच ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या मार्टिना हिंगीस हिने कोकेन घेतल्याचे विम्बल्डनदरम्यान उघड झाल्यानंतर टेनिसला अलविदा केला होता. विजेंदरनेही हेरॉईन घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्यावर बंदीची कुऱ्हाड ओढवू शकते. काही महिन्यानंतर तो या बंदीतून बाहेर येऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमनही करेल. पण ज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, अशा खेळाडूनेच वाईट गोष्टींमध्ये अडकावे, हे कुणाच्याही पचनी पडणार नाही.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी बॉक्सिंगपटू तंदुरुस्त असणे गरजेचे असते. विजेंदरने तंदुरुस्तीपाठोपाण उत्तम शरीरसंपदा कमावली आहे. कामगिरी उंचावण्यासाठी अनेक जण उत्तेजकांचा आधार घेतात. पण विजेंदरला तसे घेण्याची कोणतीच गरज नव्हती. आपल्या चार मुलांच्या बॉक्सिंग प्रशिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी बसचालक असलेल्या विजेंदरच्या वडीलांनी दिवसरात्र मेहनत घेतली. त्याची आई आजही शेतात राबताना तसेच गाई-म्हशींचे दूध काढताना दिसते. माझ्या मुलासाठी साजूक तूप आणि दूध प्यायला मिळावे आणि त्याने बॉक्सिंग रिंगमध्ये प्रतिस्पध्र्याना ताकदीने पंच लगावून देशाचे नाव उज्ज्वल करावे, हीच तिची त्यामागची भावना. पण आपला मुलगा नशेच्या आहारी गेला आहे, याची कल्पनाही त्याच्या आई-वडिलांना नसावी. आई-वडिलांनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाचा विजेंदरला कदाचित विसर पडला असवा. विजेंदरने खरोखरच हेरॉईन घेतले आहे की नाही किंवा हेरॉईनच्या तस्करीत त्याचा सहभाग आहे की नाही, हे लवकरच समोर येईल. पण हिरो ठरलेल्या विजेंदरची ‘हेरॉईन व्यसनाधीन’ ही प्रतिमा मलीन झाली, हे मात्र नक्की!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा