आठवडय़ाची मुलाखत : विमला रोहना, श्रीलंकेतील कबड्डी प्रशासक व पंच

क्रिकेट आणि फुटबॉलच्या लोकप्रियतेमुळे श्रीलंकेचा कबड्डी संघ अपेक्षेइतकी प्रगती करू शकलेला नाही. मात्र आता खेळाची सूत्रे कबड्डीपटूंकडेच आल्यामुळे सकारात्मक बदल होत आहेत. आगामी दोन-तीन वर्षांमध्ये आमचा संघ भारत व इराणला आव्हान देण्याइतपत सक्षम होईल, असा आत्मविश्वास श्रीलंकेचे आंतरराष्ट्रीय पंच विमला रोहना यांनी व्यक्त केला.

रोहना हे सध्या प्रो कबड्डी लीगमध्ये पंच म्हणून कार्यरत आहेत. ते स्वत: माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू असून त्यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने आशियाई समुद्रकिनारी कबड्डी स्पर्धेत अव्वल दर्जाची कामगिरी केली होती. सध्या ते श्रीलंकेच्या कबड्डी महासंघाचे तांत्रिक संचालक म्हणून काम करीत आहेत. रोहना यांच्याशी श्रीलंकेतील कबड्डीबाबत केलेली खास बातचीत-

* कबड्डीमध्ये श्रीलंकेने अपेक्षेइतकी प्रगती केलेली नाही. त्याचे काय कारण असू शकते?

आमच्याकडे क्रिकेट किंवा फुटबॉलपटूंना जेवढे आर्थिक पाठबळ मिळते, तेवढे पाठबळ कबड्डीपटूंना मिळत नाही. सर्वच कबड्डीपटू नोकरी करणारे असतात. त्यांना नोकरीच्या ठिकाणी या खेळासाठी रजा मिळेलच, याची खात्री नसते. त्याचप्रमाणे आमच्याकडे आंतरक्लब स्पर्धा फारशा नसतात. त्यामुळे वरिष्ठ संघाकरिता अपेक्षेइतके अव्वल दर्जाचे नैपुण्य उपलब्ध होत नाही. कनिष्ठ गटातही नैपुण्याचा अभावच दिसून येतो. पूर्वी या खेळात फारशी रुची नसलेल्या लोकांकडे खेळाची सूत्रे होती. आता खूप बदल झाले आहेत. राष्ट्रीय संघटनेचे सर्वच पदाधिकारी या खेळात काही वर्षे भाग घेतलेले आहेत. त्यामुळे या खेळात देशाने सर्वोच्च यश मिळवले पाहिजे, हा हेतू घेऊन काम करण्यास सुरुवात झाली आहे.

खेळाच्या प्रगतीसाठी काय योजना आखल्या आहेत?

प्रामुख्याने नैपुण्यशोध व विकास ही दोन सूत्रे डोळ्यांसमोर ठेवत विविध योजना आखण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणीही झाली आहे. त्यादृष्टीने १४, १६, १८ वर्षांखालील गटांकरिता स्पर्धा सुरू करण्यात येत आहेत. आमच्याकडे राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत जेमतेम आठ-दहा संघच सहभागी होत असतात. आंतरक्लब स्पर्धाच्या विकासावर भर दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे साधारणपणे गुणवान ३५ ते ४० खेळाडूंची निवड करून त्यांच्यात लीग घेण्याचेही प्रयोजन आहे. त्यामधून अव्वल दर्जाच्या १५ खेळाडूंची निवड केली जाणार आहे व या खेळाडूंकरिता राष्ट्रीय शिबिर घेतले जाईल. उर्वरित खेळाडूंना आंतरप्रांत स्तरावरील स्पर्धासाठी संधी दिली जाईल. राष्ट्रीय संघासाठी या स्पर्धामधून पुन्हा दुसऱ्या फळीतील संघ निवडला जाईल. आंतरप्रांत स्तरावर प्राथमिक साखळी व पुन्हा अव्वल साखळी पद्धतीने सामने घेण्यात येणार आहेत. जेणेकरून वर्षांतील किमान आठ महिने हे खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील सामन्यांमध्ये सहभागी असतील अशी योजना आहे. त्यामुळे उत्तम नैपुण्य तयार होईल.

* कबड्डीसाठी प्रायोजक मिळतात का?

पूर्वी प्रायोजक मिळताना अडचणी यायच्या. आता देशातील क्रीडामंत्र्यांसह तीन-चार मंत्री कबड्डी खेळाशी निगडित असल्यामुळे आर्थिक पाठबळाचा प्रश्न सुटला आहे. शासनाने या खेळासाठी भरीव तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंकरिता विमानप्रवास खर्चासह विविध सुविधा व सवलती जाहीर केल्या आहेत. त्याचा फायदा खेळाडूंना मिळणार आहे. शासनाकडूनच या खेळाच्या विकासावर भर दिला जात असल्यामुळे काही उद्योजकांनीही या खेळाकरिता आर्थिक सहकार्य देण्याचे ठरवले आहे.

*  आंतरराष्ट्रीय स्तरावर पंच म्हणून कसा अनुभव आहे?

समुद्रकिनारी क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धासाठी मी पंच म्हणून काम केले आहे. मात्र प्रो कबड्डीमध्ये पंच म्हणून मी प्रथमच काम करीत आहे. या लीगमधील नियम खूप वेगळे आहेत. टप्प्याटप्प्याने मी त्याचे बारकावे शिकत आहे. प्रो कबड्डीमुळे या खेळात खूप चांगले बदल झाले आहेत आणि या बदलांमुळे हा खेळ आणखी लोकप्रिय होत आहे. आमच्या देशात स्थानिक स्पर्धामध्ये असे नियम करण्याचे आमचे नियोजन आहे. त्यामुळे या खेळाला प्रेक्षकांचा अधिकाधिक प्रतिसाद मिळेल, अशी मला खात्री आहे.