राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करुन महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेले आणि अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह अडचणीत आले आहेत. टोकियो ऑलम्पिकमध्ये पदक जिंकणारा बजरंग पुनिया आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगाट यांच्यासह देशातील अनेक मल्ल आज दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनास बसले आहेत. विनेश फोगाट हीने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला आहे. तसेच प्रशिक्षकही महिला खेळाडूंचे शोषण करतात. त्यामुळे आम्ही याच्याविरोधात आवाज उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ही लढाई आम्ही शेवटपर्यंत लढू आणि बृजभूषण सिंह यांना पदावरुन दूर करेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराच आंदोलकांच्यावतीने देण्यात आला आहे.
हे ही वाचा >> “७२ तासांत…”, विनेश फोगाटच्या आरोपानंतर कुस्ती महासंघाला क्रीडा मंत्रालयाचे निर्देश
ते लैंगिक शोषण करतात
विनेश फोगाट यांनी सांगितले की, प्रशिक्षक महिला खेळांडूसोबत अन्याय करत आहेत. कुस्ती महासंघाचे काही जवळचे प्रशिक्षक महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण करतात. एवढंच नाही तर बृजभूषण सिंह यांनी देखील मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. तसेच जंतर मंतरवर जे इतर मल्ल आंदोलनासाठी जमले होते, त्यांनी देखील बृजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. कुस्ती महासंघ आमच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करतो. आम्हाला छळण्याचा प्रयत्न केला जातो. आमचे शोषण केले जात आहे. आम्ही जेव्हा ऑलिम्पिकसाठी बाहेर गेलो तेव्हा आम्हाला फिजियो कोच दिला गेला नाही. जेव्हा आम्ही याविरोधात आवाज उचलतो, तेव्हा आम्हाला धमकी देवून शांत केले जाते.
विनेश फोगाट आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना म्हणाली की, टोकयो ऑलिम्पिकमध्ये जेव्हा मी पराभूत झाले तेव्हा बृजभूषण सिंह यांनी मला ‘खोटा शिक्का’ असल्याचा शेरा मारला. त्यांनी माझे मानसिक खच्चीकरण केले. मी रोज मला स्वतःला संपविण्याचा विचार करायचे. जर आमच्यापैकी एकाही मल्लाला काही झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी WFI चे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांची असेल.
हे ही वाचा >> ‘महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण आणि…’; Brij Bhushan Sharan Singh यांच्यावर Vinesh Phogatचे गंभीर आरोप
कुस्ती महसंघाच्या बेबंदशाहीविरोधात मल्ल एकवटले
भारतामधील अनेक दिग्गज मल्ल आज दिल्लीत कुस्ती महासंघाच्या विरोधात आंदोलन करत आहेत. यामध्ये बजरंग पुनियाचा देखील समावेश आहे. पुनिया यांनी सांगितले की, कुस्ती महासंघ मल्लांना त्रास देण्याचे काम करत आहे. जे लोक कुस्ती महासंघात बसले आहेत, त्यांना खेळाविषयी काही ममत्व नाही. आम्ही आता ही हुकूमशाही आणखी सहन करणार नाही. तर ऑलम्पिक पदक विजेती साक्षी मलिक म्हणाली की, आम्ही कुस्ती महासंघाच्या बेबंदशाहीविरोधात एकवटलो आहोत. सर्व मल्ल आमच्या पाठिशी आहेत.
हे ही वाचा >> राज ठाकरे पुन्हा अयोध्येत आल्यास स्वागत करणार का? या प्रश्नावर खासदार बृजभूषण सिंह म्हणाले, “मी कुस्तीचा…”
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला केला होता विरोध
भाजपाचे खासदार असलेले बृजभूषण सिंह हे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानंतर चांगलेच चर्चेत आले होते. त्यांच्यामुळे राज ठाकरेंना अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. मागच्याच आठवड्यात बृजभूषण सिंह हे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुण्यात आले होते. तेव्हा कुस्ती आणि खेळाडूंच्या भविष्याबाबत त्यांनी खूप काही सांगितले. त्यांच्या सूचनांचा स्वीकार करत उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुस्तीसाठी विशेष निधी देऊन खाशाबा जाधव यांच्याप्रमाणे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे मल्ल तयार करु, असे उत्तर दिले होते.