‘रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’चे प्रमुख बृजभूषण सिंह आणि इतर प्रशिक्षकांनी अल्पवयीन महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप काही भारतीय कुस्तीपटूंनी केला होता. याप्रकरणी जानेवारी महिन्यात जंतरमंतरवर विनेश फोगाट, बजरंग पुनियांसह अनेक खेळाडूंनी आंदोलनेही केली. परंतु, याप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई न झाल्याने भारतीय कुस्ती संघातील वरिष्ठ खेळाडूंनी आंदोलन पुकारलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बृजभूषण सिंह यांच्यासह इतर आरोपींवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत इथून हटणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्या खेळाडूंनी जाहीर केली. यानंतर हे आंदोलनकर्त्या खेळाडूंनी न्याय मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’चे प्रमुख बृजभूषण सिंह यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा, याची मागणी करण्यासाठी कॉमनवेल्थ गेम्स सुवर्णपदक विजेती विनेश फोगट हिच्यासह सात इतर खेळाडूंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

याप्रकरणी प्रतिक्रिया देताना ऑलिम्पिक पदक विजेती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली, “जानेवारी महिन्यात हे प्रकरण उजेडात आल्यानंतर महिला कुस्तीपटू लैंगिक शोषणाप्रकरणी चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने केंद्रीय क्रिडा मंत्र्यांना अहवाल सादर केला आहे. परंतु, अहवाल अद्यापही सार्वजनिक केला नाही. तसंच संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नाही.”

“महिला कुस्तीपटूंचे जबाब नोंदवणारा अहवाल सार्वजनिक व्हावा, अशी आमची इच्छा आहे. हा एक संवेदनशील मुद्दा आहे, तक्रारकर्त्यांपैकी एक अल्पवयीन मुलगी आहे”, असंही त्या पुढे म्हणाल्या.

वारंवार प्रयत्न करूनही सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे कॉमनवेल्थ गेम्स सुवर्णपदक विनेश फोगट यांनी सांगितले. “आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही इथेच जेवणार आणि झोपणार आहोत. आम्ही तीन महिन्यांपासून क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि इतर संबंधित प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. समितीचे सदस्य आम्हाला प्रतिसाद देत नाहीत, क्रीडा मंत्रालयाकडूनही काही सांगण्यात येत नाही. ते आमचे कॉलही उचलत नाहीत. आम्ही देशासाठी पदके जिंकली आहेत आणि यासाठी आमचे करिअर पणाला लावले आहे,” असं विनेश फोगाट यांनी पुढे स्पष्ट केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinesh phogat and seven wrestlers move supreme court for registration of fir against wfi president brij bhushan singh rmm