U17 Women’s Wrestling India won 4 Gold Medals: भारताच्या आदिती कुमारी (४३ किलो), नेहा सांगवान (५७ किलो), पुलकित (६५ किलो) आणि मानसी लाथर (७३ किलो) या मुलींनी कनिष्ठ (१७ वर्षांखालील) जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत गुरुवारी सुवर्णपदकांची कमाई केली.
प्रथम आदितीने ४३ किलो वजनी गटात अप्रतिम कामगिरी करताना ग्रीसच्या मारिया लुईझा गकिकाचा ७-० असा सहज पराभव केला. ५७ किलो वजनी गटात नेहाने जपानच्या सो सुईसुईला पराभूत करत सोनेरी यश संपादन केले. त्यानंतर ६५ किलो वजनी गटात पुलकितने चुरशीच्या लढतीत तटस्थ खेळाडू म्हणून खेळणाऱ्या दारिया फ्रोलोवाचा ६-३ असा पराभव केला. मग मानसीने हॅना पिर्सकायाला चितपट केल्याने भारताला सुवर्णपदकाचा चौकार साकारता आला.
तसेच श्रुतिका पाटील (४६ किलो) आणि काजल (६९ किलो) यांनी अंतिम फेरी गाठताना आणखी दोन सुवर्णपदकांच्या आशा कायम राखल्या आहेत. राज बाला (४० किलो) कांस्यपदकाच्या लढतीत खेळणार असून मुस्कान (५३ किलो) आणि रजनिता (६१ किलो) यांनी रेपिचेज फेरी गाठल्याने त्यांनाही पदक मिळवण्याची संधी आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमधून भारताची कुस्तीपटू विनेश फोगट तिच्या बलाली गावात पोहोचली तेव्हा तिने एक इच्छा व्यक्त केली होती. ती म्हणाली होती की बलालीमधून आणखी महिला कुस्तीपटू उदयास याव्यात ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा गौरव करतील. तिच्या वक्तव्यानंतर काही दिवसांनी बलाली येथील १७ वर्षीय नेहाने १७ वर्षांखालील जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
हेही वाचा – Australia U19 Women’s Squad: भारतीय वंशाच्या लेकी कांगारू संघात, पाहा कोण आहेत या खेळाडू?
नेहाने महावीर फोगट यांच्या अकादमीतून प्रशिक्षणही घेतले आहे. हरियाणाची राज्य चॅम्पियन झाल्यावर तिने प्रशिक्षक बदलले. ती सध्या कृष्णन आखाड्यात साजन सिंग मंडोला यांच्याकडे प्रशिक्षण घेते.
विनेश फोगटबद्दल काय म्हणाली सुवर्णपदक विजेती नेहा सांगवान
नेहाने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, ‘माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. हा विजय विनेश दीदी आणि महिला कुस्तीपटूंसाठी आहे. विनेश दीदी आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत. हे विजेतेपद बलाली गावातील महिला कुस्तीपटूंना प्रेरणा देईल. विनेशबद्दल नेहा म्हणाली, ‘विनेश दीदीने जे यश मिळवले आहे, ते आमच्या गावातील इतर कोणीही मिळवले नाही. आमच्यासाठी ते सुवर्णपदक त्याचं होतं. आम्ही त्यांना तेच सांगितले. त्यांच्यासारखं आम्ही थोडंसं काही करू शकलो तर ती खूप मोठी गोष्ट असेल.
नेहाचे वडील अमित कुमार म्हणाले की, विनेश फोगटच्या बलालीमधील भाषणानंतर काही दिवसातच त्यांच्या मुलीने देशासाठी पदक जिंकले. अमित यांनी सांगितले की, जेव्हा विनेश बलालीमध्ये गेल्या आठवड्यात परतली तेव्हा ते आणि त्यांची मुलगी स्टार कुस्तीपटूला भेटले. अमित सांगवान म्हणाले, ‘नेहा दुपारभर नोटांचा हार घेऊन विनेशची वाट पाहत होती. स्टेजवर गेल्यावर विनेशने तिला सांगितले की, तिचे स्वप्न फक्त नेहासारख्या मुलींनीच पूर्ण करायचे आहे. नेहाच्या यशाने विनेशला खूप आनंद झाला आहे. बलाली गावासाठी ही एक खास संधी आहे.
© IE Online Media Services (P) Ltd