Vinesh Phogat appeals against Paris Olympic disqualification with CAS : गेल्या तीन दिवसांपासून भारतासह पॅरिस ऑलिम्पिक व्हिलेजमध्येही विनेश फोगटला हुलकावणी दिलेल्या पदकाची चर्चा होत आहे. विनेशनं ५० किलो वजनी गटात थेट अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. पण अंतिम फेरीच्या सामन्याआधी केलेल्या वजनात तिचं वजन ५० किलो १०० ग्रॅम इतकं भरलं. त्यामुळे तिला अंतिम सामन्यात खेळण्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं. यावरून भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना स्वत: विनेश फोगटनं आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद अर्थात CAS कडे दाद मागितली आहे. रौप्य पदक दिलं जावं, अशी मागणी तिनं केली असून त्यावर सुनावणी चालू आहे. यादरम्यान, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघानं या प्रकरणावर मोठं भाष्य केलं आहे.
विनेश फोगट अपात्र ठरल्यानंतर तिच्याविरुद्ध पराभूत झालेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला अंतिम फेरीत खेळण्याची संधी देण्यात आली. मात्र, अंतिम फेरीपर्यंत धडक मारल्यामुळे विनेश फोगटचं रौप्य पदक निश्चित झालं होतं. तोपर्यंत तिने वजनाबाबत निश्चित निकष पूर्ण केले होते. अंतिम सामन्याआधी केलेल्या वजनात १०० ग्रॅम जास्त वजन आलं. त्यामुळे सर्व निकषांची पूर्तता करून रौप्य पदकासाठी पात्र ठरलेल्या विनेश फोगटला रौप्य पदक दिलं जावं, अशी मागणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे विनेशची बाजू मांडत आहेत.
नियमानुसार विनेशला पदक देणं शक्य आहे का?
दरम्यान, या प्रकरणावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी मोठं विधान केलं आहे. नियमानुसार एकाच वजनी गटात दोन रौप्य पदकं देता येणार नाहीत, असं बाक यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता विनेश फोगटच्या प्रकरणावर CAS कडून काय निकाल दिला जातो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धा संपायच्या आत हा निकाल दिला जाईल, असं सीएएसनं स्पष्ट केलं आहे.
“जर तुम्ही मला सामान्य परिस्थितीत एकाच गटात दोन रौप्य देणं शक्य आहे का? असं विचारत असाल तर माझं उत्तर नाही असं आहे. आम्हाला आंतरराष्ट्रीय फेडरेशननं ठरवून दिलेले नियम पाळावे लागतात. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय फेडरेशन, युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या संस्था निर्णय घेतात”, असं बाक यांनी स्पष्ट केलं आहे.
“कुठे थांबायचं हे ठरवावं लागतं”
दरम्यान, बाक यांनी नेमकं कुठल्या बिंदूवर थांबायचं हे ठरवणं आवश्यक असल्याचं यावेळी नमूद केलं. “या अशा प्रकरणाचा विचार करता एक गोष्ट ठरवावी लागते, की तुम्ही कुठला बिंदू शेवटचा मानाल? तुम्ही म्हणता १०० ग्रॅम असेल तर आम्ही द्यायला हवं. पण मग १०२ ग्रॅम असेल तर आम्ही द्यायला नको असं तुमचं म्हणणं आहे का? आता हे प्रकरण CAS समोर सुनावणीसाठी गेलं आहे. शेवटी CAS जो निर्णय घेईल, तो आम्ही पाळू. पण त्यातही, इंटरनॅशनल फेडरेशननं त्यांचे नियम लागू करून त्यांचाही आढावा घ्यायला हवा. त्यामुळे यासंदर्भात निर्णय घेणं ही त्यांची जबाबदारी आहे”, असं बाक यांनी नमूद केलं.