Vinesh Phogat Disqualified Olympics : कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आहे. ५० किलो वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेत तिने अंतिम फेरीत धडक दिली होती. तिचं वजन ऑलिम्पिक सामन्यापूर्वी करण्यात आलं तेव्हा ते ५० किलो १५० ग्रॅम भरलं खरंतर तिने वजन कमी करण्यासाठी अथक प्रयत्न केले. तरीही जे व्हायचं ते झालंच. विनेश फोगटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं आणि भारताने ‘सुवर्ण’संधी गमावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं?

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला चौथं पदक निश्चित झालंय असं वाटत असतानाच एक वाईट बातमी येऊन धडकली. कुस्तीत महिलांच्या ५० किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat ) हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. या मोठ्या निर्णयामागचे कारण म्हणजे ५० किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन वाढले होते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार विनेशचे (Vinesh Phogat) वजन जास्त होते. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले आहे, ज्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कुस्तीपटूचे वजन मर्यादेपेक्षा अंदाजे १५० ग्रॅम जास्त आहे, ज्यामुळे तिला अपात्र ठरवले आहे. मात्र वजन कमी करण्यासाठी विनेशने प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी अपात्र

विनेशने वजन कमी करण्यासाठी काय केलं?

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार मंगळवारी रात्री विनेशला (Vinesh Phogat) कळलं की तिचं वजन ५२ किलो आहे. त्यानंतर तिने वजन कमी करण्यासाठी बरीच मेहनत घेतली. तिने जॉगिंग केलं, दोरीवरच्या उड्या मारल्या, त्यानंतर सायकलिंगही केलं. एवढंच काय विनेश फोगटने केस कापले, नखं कापली, रक्तही काढलं मात्र शेवटी जे व्हायचं ते झालंच तिचं वजन १५० ग्रॅम जास्त भरलं. आणखी ५० ग्रॅम वजन जर विनेश (Vinesh Phogat) कमी करु शकली असती तर ती ही स्पर्धा खेळू शकली असती.

Vinesh Phogat : “विनेशविरोधात ब्रिजभूषण सिंह यांचा सर्वात मोठा कट, त्यामुळेच…”; सासऱ्यांचा गंभीर आरोप

कुस्तीचा नियम काय सांगतो?

कुस्तीमध्ये, कोणत्याही कुस्तीपटूला फक्त १०० ग्रॅम जास्त वजनाची सूट मिळते. म्हणजेच, विनेशचं (Vinesh Phogat) वजन ५० किलो १०० ग्रॅम भरलं असतं, तर ती सुवर्ण पदकाची लढत खेळू शकली असती, पण तिचं वजन त्याव्यतिरिक्त आणखी ५० ग्रॅम जास्त होतं आणि त्यामुळे तिचे ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न भंगलं आणि ती अपात्र ठरली. कुस्तीमध्ये कुस्तीच्या सामन्यांपूर्वी पैलवानांचे वजन केले जाते. याशिवाय कुस्तीपटूला त्याच श्रेणीत आपले वजन दोन दिवस राखायचं असतं मात्र विनेशला तसं करता आलं नाही. समोर आलेल्या माहितीनुसार तिचं वजन ५२ किलोपर्यंत पोहोचलं होतं, तिनं ते नियंत्रणात आणण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी ती अपयशी ठरली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinesh phogat disqualified from paris drewas her blood cut hair what she did scj