पॅरिस : अवघ्या १०० ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे भारताची अनुभवी कुस्तीगीर विनेश फोगटचे ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे स्वप्न अधुरेच राहिले. ५० किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेशचे अंतिम फेरीच्या दिवशी, बुधवारी वजन अधिक भरल्याने तिला पॅरिस स्पर्धेतून थेट अपात्र ठरवण्यात आले.
विनेशच्या या धक्कादायक अपात्रतेमुळे देशभरातील तिच्या लाखो चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली. मात्र यानिमित्त, विनेशच्या सोबत पॅरिसला गेलेले तिचे सहायक पथक, तसेच ऑलिम्पिक समितीच्या कार्यक्षमतेविषयीदेखील प्रश्न उपस्थित होतो.
ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीगीर ठरण्याचा मान विनेशने मंगळवारी मिळवला होता. परंतु ही यशोगाथा अधुरीच राहिली. अपात्र ठरल्यामुळे विनेश स्पर्धकांमध्ये शेवटची आली. तिला सुवर्ण किंवा रौप्य नव्हे, तर कांस्य पदकावरही पाणी सोडावे लागले.
ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत प्रत्येक वजनी गटाची स्पर्धा दोन दिवस चालते. पहिल्या दिवशी उपांत्य फेरीपर्यंतच्या लढती, तर दुसऱ्या दिवशी अंतिम लढती खेळवण्यात येतात. या दोन्ही दिवशी मल्लांचे सकाळी ८ वाजता वजन घेतले जाते. मल्लाने आपल्या वजनी गटाइतकेच वजन राखणे अनिवार्य असते. पहिल्या दिवशी स्पर्धेला सुरुवात होताना विनेशचे वजन ४९.५ किलो भरले होते. मात्र, तीन लढती खेळल्यानंतर विनेशचे वजन ५२.७ किलो झाले होते. हे वजन कमी करण्यासाठी विनेशने अथक परिश्रम घेतले. रात्रभर न झोपता, पाणी न पिता, सातत्याने दोरीवरच्या उड्या मारत, जॉगिंग करत, सायकलिंग, सॉना बाथ घेत तिने वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बुधवारी सकाळी तिचे वजन ५०.१०० ग्रॅम भरले. त्यामुळे ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धा समितीने नियमानुसार विनेशला अपात्र ठरवले. यासह ती ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कुस्तीगीर ठरण्यापासून वंचित राहिली.
हेही वाचा >>> Vinesh Phogat: विनेश फोगटची ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर क्रीडा कोर्टात धाव, रौप्यपदक मिळावं अशी केली विनंती
वजनी गट का बदलला?
विनेशचे नैसर्गिक वजन हे ५६-५७ किलोच्या आसपास आहे. त्यामुळे ती आतापर्यंत ५३ किलो वजनी गटात खेळत होती. मात्र, मॅटबाहेरील संघर्षाच्या कालावधीत ५३ किलो गटातील ‘ऑलिम्पिक कोटा’ अंतिम पंघालने मिळवला होता. त्यानंतर राष्ट्रीय निवड चाचणीत ५३ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत विनेश पराभूत झाली. अशा वेळी ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी ५० किंवा ५७ किलो वजनी गट असे दोनच पर्याय विनेशकडे होते. अखेर विनेशने ५० किलो वजनी गटास पसंती दिली आणि राष्ट्रीय निवड चाचणीत बाजी मारली.
दुर्लक्ष की दुराग्रह?
● पहिल्या दिवशी विनेशचे वजन निर्धारित मर्यादेच्या आत होते. पण दिवसभरात तीन कुस्त्या खेळायच्या होत्या. प्रत्येक कुस्तीनंतर शक्तीक्षय होतो आणि ऊर्जा व ताकद वाढवण्यासाठी अन्नग्रहण करावेच लागते. पहिली कुस्ती जगज्जेतीसमोर होती. ती विनेशने चतुराईने जिंकली. नंतरच्या दोन्ही लढतींसाठी ताकद अधिक लावावी लागली.
● यासाठी अधिक पोषणमूल्ये असलेला आहार घ्यावा लागला का, नंतरच्या दोन कुस्त्यांमध्ये सर्वस्वी ताकदीऐवजी वेगळे डावपेच वापरता आले असते का, दिवसभरातच दोन किलोंनी वजन वाढल्यामुळे सायंकाळनंतर ते कमी करण्याचे प्रयत्न कमी पडले का, असे प्रश्न उपस्थित होतात. याबाबत विनेशने दुराग्रही भूमिका घेतली, की सहायक पथकाने बेफिकीरी दाखवली याविषयी ऑलिम्पिक संघटनेला खुलासा करावा लागेल.
विनेश तू विजेत्यांमधील विजेती आहेस. आजची घटना दु:खद असून, मी किती निराश झालो आहे, हे शब्दांत मांडणे खूप अवघड आहे. तू खंबीर आहेस. आव्हानांना सामोरे जाणे हे तुझ्या स्वभावातच आहे. अशीच खंबीरपणे उभी रहा. आम्ही सर्व जण तुझ्याबरोबर आहोत. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
क्रीडाग्राममध्ये विनेशची भेट घेऊन तिला धीर दिला. भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए) आणि भारत सरकार, तसेच संपूर्ण देश तुझ्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. भारतीय कुस्ती संघटनेने संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेकडे विनेशच्या अपात्रतेविषयी फेरविचार करण्याची विनंती केली आहे.– पी. टी. उषा, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष.