Vinesh Phogat Disqulified : ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचलेली धाकड गर्ल विनेश फोगट आता कोणत्याही पदाकासाठी खेळू शकणार नाही. तिच्या वजनात १५० ग्रॅम अधिक वाढ झाल्याने तिला अंतिम सामन्यातून अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे ऑलिम्पिकच्या स्पर्धेतून ती बाहेर पडली आहे. दरम्यान, हा षडयंत्राचा भाग असल्याची चर्चा आता सुरू झाली असून तिला जाणीवपूर्वक अपात्र ठरवले असल्याचा दावाही सोशल मीडियावर केला जातोय. या सर्व बाबींवर हिंदकेसर दीनानाथ सिंग यांनी एबीपी माझाशी सविस्तर चर्चा केली.
वजन कमी करायचं तर तोंडावर कंट्रोल पाहिजे
“विनेश फोगट अपात्र होणं हे आपल्या देशाचं दुर्भाग्य आहे. कधीकधी असं असतं की आपली इच्छा असते पण देवाचीच इच्छा नसते. आज देशाचा गर्व होता, देशाची शान होती. ती लढणारी मुलगी आहे. पण वजनावर कंट्रोल ठेवता आलं नाही. खेळाडूंना सवय असते की वजन कमी करून खालच्या वजनात लढायचं. पण वजन राखता आलं पाहिजे. वजन कमी करताय तर वजन राखलं पाहिजे. तोंडावर कंट्रोल केला पाहिजे. काहीतरी खाललं असेल, कारण पोटात काहीतरी गेल्याशिवाय वजन कधीच वाढत नाही”, अशी खंत दीनानाथ सिंग यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >> मोदीजी, विनेश उपांत्य फेरी जिंकली, पण श्रेय लाटण्याची वेळ आता निघून गेली
पाणी प्यायलात तरी अर्धा किलो वजन वाढतं
“एशियाडमध्ये शामराव साबळे याने त्याच्या आईने बनवलेला लाडू नेला होता. आईने लाडू दिला आहे म्हणून त्याने दोन लाडू खालले. पण त्यामुळे त्याचं शंभर ग्राम वजन वाढलं अन् तो अपात्र ठरला”, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. वजन वाढलं तर तुम्ही लढू शकत नाही. वजनावर कंट्रोल ठवेलं पाहिजे. तुम्ही अर्धाग्लास पाणी प्यायलात तर अर्धा किलो वजन वाढतं. उपवास करायची सवय नाही पैलवान लोकांना”, असंही ते म्हणाले.
रात गई बात गई
दरम्यान, विनेश फोगटला अपात्र करणं हा षडयंत्रचा भाग असल्याची टीका केली जातेय. त्यावर दीनानाथ सिंग म्हणाले, “षडयंत्र कसं होणार? भारताचा कोण शत्रू आहे? माझा कोण शत्रू आहे? जो नियम आहे तो आहे. नियमाचं पालन झालंच पाहिजे.” तसंच, अपात्र ठरल्यानंतर यातून पर्याय निघू शकतो का? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यांनी या पर्यायावर नाही असं उत्तर दिलं. “शक्य नाही. बात गई रात गई”, असं ते म्हणाले.
हेही वाचा >> Vinesh Phogat : विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र, लोकसभेत राडा, ‘क्रीडामंत्री उत्तर द्या’ म्हणत विरोधकांची घोषणाबाजी
या नियमाचा बऱ्याचवेळा पश्चाताप झालाय
ते पुढे म्हणाले, “आपली छोटीशी एक चूक किती त्रास देऊन गेली. वजन कमी केल्यानंतर जीभेवर कंट्रोल ठेवलं पाहिजे. अंघोळसुद्धा करायची नसते. त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्वांनी तिची काळजी घ्यायला पाहिजे होती. देखरेख करायला पाहिजे होती. शौचास, मूत्रास गेल्यावरही दारापाशी उभं राहावं लागतं. तिथंही पाणी प्यायला देत नाहीत. या नियमाचा पश्चाताप बऱ्याचवेळा झाला.”
देश का कोई दुश्मन हो सकता है क्या?
विनेश आधीपासूनच म्हणत होती की माझ्याविरोधात षडयंत्र रचलं जाईल, याबाबत ते म्हणाले, “हे शक्य आहे का? कोई देश का दुश्मन हो सकता है क्या? (कोणी देशाचं शत्रू असू शकतं का?) तो जागतिक नियम आहे. हरल्यानंतर सर्व बोलतात. पण हे उचित नाही. आम्हीही परदेशात गेलो आहे. वजन कमी नाही केलं तर आऊट. आऊट केल्यानंतर कोणावर तरी आरोप करायचे.”
“विनेशने निश्चित गोल्ड मेडल आणलं असतं. जिगरबाज मुलगी आहे. ज्या आईने तिला जन्म दिला ती आई धन्य आहे. असं घडायला नको होतं, पण असं घडलं आहे”, असंही कौतुक त्यांनी पुढे केलं.