Vinesh Phogat WFI President Sanjay Singh : पॅरिसमधून भारतीयांना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भारताचं एक ऑलिम्पिक पदक जवळजवळ निश्चित झालंय असं वाटत असतानाच एक वाईट बातमी येऊन धडकली. कुस्तीत महिलांच्या ५० किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगट हिचं वजन ५० किलोपेक्षा १०० ग्रॅमने अधिक असल्यामुळे तिला अंतिम लढतीपूर्वी अपात्र ठरवण्यात आलं आहे. विनेशकडून देशाला सुवर्णपदकाची आशा होती. मात्र, लहानशा चुकीची तिला व देशाला मोठी किंमत मोजावी लागली आहे. या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशातच कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी देखील यावर भाष्य केलं आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह म्हणाले, “विनेशने इतका चांगला खेळ सादर केला, ती या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली, त्यानंतर ती अपात्र ठरली आहे, ही गोष्ट आपल्या देशासाठी खूप दुर्दैवी आहे. केवळ १०० गॅम वजन अधिक असल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं. भारत सरकारने विनेशला प्रशिक्षक, आहार तज्ज्ञ आणि फिजिओ प्रदान केले आहेत. हे सर्वजण तिच्याबरोबर पॅरिसमध्ये आहेत. विनेशचं वजन वाढलेलं असताना ते दोघे काय करत होते?”
संजय सिंह म्हणाले, “विनेशचं वजन दोन दिवस स्थिर होतं. मात्र रातोरात तिचं वजन वाढलं. तिचं वजन कशामुळे वाढलं ते केवळ तिचे प्रशिक्षक आणि आहारतज्ज्ञच सांगू शकतात. आम्ही याप्रकरणी काही कायदेशीर उपाय योजू शकतो का याची चाचपणी करत आहोत. भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षा पी. टी. उषा पॅरिसमध्येच आहेत. आम्ही त्यांच्याशी देखील चर्चा करत आहोत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती व जागतिक संयुक्त कुस्ती संघटनेसमोर कोणकोणते मुद्दे उपस्थित करता येतील यावर आम्ही चर्चा करत आहोत.”
“…तर भारताने ऑलिम्पिकवर बहिष्कार घालावा”, आपची मागणी
दरम्यान, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी देखील याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “हा विनेश फोगटचा नव्हे तर भारत देशाचा अपमान आहे. विनेश जगभरात मोठा इतिहास रचण्याच्या तयारीत होती. तिचं वजन ५० किलोपेक्षा केवळ १०० ग्रॅम अधिक असल्याचं सांगत तिला अपात्र ठरवण्यात आलं आहे. हा तिच्यावरचा मोठा अन्याय आहे. संपूर्ण देश विनेशबरोबर उभा आहे. केंद्र सरकारने तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करावा. ऑलिम्पिक समितीने ऐकलं नाही तर भारताने ऑलिम्पिकवर बहिष्कार घालावा.”