Vinesh Phogat Olympics 2024 failure Brij Bhushan Sharan Singh Reacts : भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटू विनेश फोगटबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “विनेश फोगटला ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्यासाठीच्या सामन्यात अवैधरित्या विजयी घोषित करण्यात आलं होतं. ऑलिम्पिक स्पर्धेत तिला त्याचे परिणाम भोगावे लागले. ईश्वराने तिला तिच्या कृतीचं उत्तर दिलं”. बृजभूषण शरण सिंह यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे की एक खोळाडू एकाच वेळी दोन वेगवेगळ्या वजनी गटांमध्ये चाचणी देऊ शकत नाही. हा कुस्तीचा नियम आहे. मात्र तिने ५० किलो व ५३ किलो अशा दोन वजनी गटांमध्ये चाचण्या दिल्या. दोन्ही गटांमध्ये ती पराभूत झाली होती. मात्र तिला अवैधरित्या विजयी घोषित करण्यात आलं

बृजभूषण शरण सिंह म्हणाले, “५३ किलो वजनी गटात तिचा १०-० असा पराभव झाला. त्यानंतर पाच तासांनी तिने ५० किलो वजनी गटाची चाचणी दिली. या सामन्यात शिवानी पवार ही ५-० ने पुढे होती. मात्र मध्येच गोंधळ झाला. त्यानंतर रेफ्रींनी विनेशला विजयी घोषित केलं”.

कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष म्हणाले, “या लोकांनी माझ्यावर जे आरोप केले होते त्यावर अद्याप तपास चालू आहे. परंतु, मी सुरुवातीपासून सांगतोय की त्यांचे आरोप खोटे आहेत. प्रसारमाध्यमं ज्या आंदोलनाबाबत बोलत आहेत, माझ्यावर टीका करत आहेत ते आंदोलन मुळात खेळाडूंचं आंदोलन नव्हतं. ते काँग्रेसचं आंदोलन होतं. त्यामागे काँग्रेसचाच हात होता. विनेश-बजरंगच्या काँग्रेस प्रवेशानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की काँग्रेसने माझ्याविरोधात मोठं षडयंत्र रचून मला कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवलं.”

हे ही वाचा >> “विनेशच्या अपात्रतेचा आनंद साजरा करणारे…”; बृजभूषण शरण सिंह यांच्या ‘त्या’ टीकेला बजरंग पुनियांचे जोरदार प्रत्युत्तर!

कुस्तीपटूंच्या आंदोलनावर टीका

ऑलिम्पिक पदक विजेता मल्ल बजरंग पुनिया व विनेश फोगट या दोघांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विनेशला काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीचं तिकिट देण्यात आलं आहे. तर, बजरंगलाही उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यावर बृजभूषण शरण सिंह म्हणाले, मला हरियाणाच्या जनतेला सांगायचं आहे की बजरंग व विनेशने महिला कुस्तीपटूंच्या सन्मानासाठी आंदोलन केलं नव्हतं. त्यांनी केवळ त्यांच्या व काँग्रेसचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आपल्या लेकींचा वापर केला. विनेश व बजरंगने आमच्या लेकींच्या सन्मानाला धक्का लावला, त्यांचा अपमान केला. ते कधीच मुलींच्या सन्मानासाठी आंदोलन करत नव्हते. ते केवळ राजकारणासाठी आंदोलन करत होते”.