Vinesh Phogat meet uncle Mahavir Phogat in Balali : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतून पदकाशिवाय परतलेल्या कुस्तीपटू विनेश फोगटचे स्वागत एखाद्या पदक विजेत्या खेळाडूंचेही झाले नसेल, अशा प्रकारे करण्यात आले. विनेश फोगटचे पॅरिसहून भारतात परतण्यास विलंब झाला. कारण सीएएसमधील तिच्या अपीलच्या निकालाची ती वाट पाहत राहिली. ऑलिम्पिकमधील ५० किलो वजनाच्या सुवर्णपदकाच्या लढतीत १०० ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरल्यानंतर याचिका दाखल केली होती. ती अपील बुधवारी फेटाळण्यात आली. गावी पोहोचल्यानंतर विनेश फोगटने काका महावीर यांची भेट घेतली.
विनेश फोगट शनिवारी रात्री तिच्या मूळ गावी पोहोचली –
विनेश फोगट शनिवारी रात्री हरियाणातील बेलाली गावातील चरखी दादरी येथे पोहोचली. तिचे येथे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी विनेशने काका महावीर फोगट यांना मिठी मारली. दोघेही खूप भावूक दिसत होते. यादरम्यान विनेशने सांगितले की, ऑलिम्पिकमध्ये पदक न मिळाल्याने तिला खूप दुख झाले आहे. ही जखम बरी व्हायला वेळ लागेल. याशिवाय ती म्हणाली की भारतीय कुस्ती महासंघ (डब्ल्यूएफआय) विरुद्धची आपली लढाई संपलेली नाही. हा लढा दीर्घकाळ चालणार आहे.
यापुढेही लढा सुरूच ठेवणार आहोत –
विनेश फोगट म्हणाली, “हे ऑलिम्पिक पदक खोल जखम बनले आहे. ते भरायला वेळ लागेल, पण मला माझ्या देशातील जनतेचे आभार मानायचे आहेत. मी कुस्ती सोडली आहे की पुढे चालू ठेवणार, हे मी आत्ताच काही सांगू शकत नाही. आमचा लढा संपलेला नाही. मी नुकताच त्याचा एक भाग पार करून आली आहे. ही एक दीर्घ लढाई आहे. आम्ही गेल्या एक वर्षापासून यासाठी लढत आहोत आणि यापुढेही सुरूच ठेवणार आहोत.”
या गावाची आणि तुम्हा लोकांची मी सदैव ऋणी राहीन –
विनेश फोगट आपल्या गावातील लोकांना संबोधित करताना म्हणाली गावातील मुलींनी कुस्तीत पुढे यावे, अशी तिची इच्छा आहे. ती म्हणाली, “मला माहित नाही की मी इतके प्रेम आणि आदर मिळवण्यास पात्र आहे की नाही, परंतु मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते की मी अशा गावात, अशा लोकांत जन्माला आले याचा मला अभिमान आहे. माझ्या गावाचा सन्मान करून त्याचे ऋण फेडण्यात मी भूमिका बजावू शकली याचा मला सार्थ अभिमान आहे. या गावासाठी आणि तुमच्या सन्मानासाठी लढण्यासाठी मी नेहमीच सर्वात पुढे असेन.”
हेही वाचा – The Hundred 2024 : प्रथमच खेळला गेला ‘सुपर ओव्हर’पेक्षा लहान षटकाचा सामना, असा लागला ‘टाय मॅच’चा निकाल
माझ्या बहिणीने पुढे येऊन माझे सर्व विक्रम मोडावे –
विनेश पुढे म्हणाली, “आपल्या गावातील प्रत्येक घरातील माझ्या बहिणीने पुढे यावे आणि कुस्तीतील माझे सर्व विक्रम मोडावे, अशी माझी मनापासून इच्छा आहे. तसेच माझ्याप्रमाणे आपल्या गावातून कोणी पुढे आले नाही, तर मला खूप वाईट वाटेल. कारण आता मार्ग दाखवला आहे, आशा निर्माण केली आहेत. आमच्या नंतर आमच्या बहिणींनी वारसा पुढे चालवत ठेवायचा आणि हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तुम्ही सर्वांनी, माझ्याप्रमाणे माझ्या बहिणींना साथ दिली पाहिजे. त्या खूप काही करू शकतात. आम्हाला तुमची साथ, तुमची आशा, तुमचा विश्वास हवा आहे.”