कुस्तीपटू बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत केल्यानंतर आता कुस्तीपटू विनेश फोगटनेही पुरस्कार परत केले आहेत. कुस्तीपटू विनेश फोगट खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार पंतप्रधान कार्यालयाला परत देण्यासाठी निघाली होती. मात्र तिला वाटेतच पोलिसांनी रोखलं, त्यामुळे विनेशने नाईलाजाने कर्तव्यपथावरच आपले पुरस्कार ठेवले. कुस्तीपटू बजरंग पुनियाने या घटनेचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया साईटवर अपलोड केला आहे. “हा दिवस कोणत्याही खेळाडूच्या जीवनात येऊ नये. देशाच्या महिला मल्ल सर्वात अवघड परिस्थितीतून जात आहेत”, असा मजकूर बजरंग पुनियाने लिहिला आहे.
२२ डिसेंबर रोजी बजरंग पुनियानेही अशाच प्रकारे आपला पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांच्या निवासास्थानाबाहेर ठेवला होता. त्याआधी बजरंग पुनियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पद्मश्री पुरस्कार परत देणार असल्याचे सांगितले होते.
भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक जिंकून बृजभूषण शरण सिंह यांचे सहकारी संजय सिंह नवे अध्यक्ष झाल्यानंतर साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. तर बजरंग पुनिया याने त्याचा पद्मश्री पुरस्कार परत केला. त्यापाठोपाठ गुंगा पहलवान अशी ओळख असलेल्या विरेंद्र सिंह यानेदेखील पद्मश्री परत करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता विनेशने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केले.
विनेशनेही काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले होते. या पत्रात तिने म्हटले की, देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना हे सगळं करण्यास भाग पाडलं जात आहे. हे आम्हाला का करावं लागतंय ते संपूर्ण देशाला माहिती आहे. तुम्ही देशाचे प्रमुख आहात. ही बाब नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. पंतप्रधान मोदीजी, मी तुमच्या घरातली लेक विनेश फोगट आहे, मी गेल्या वर्षभरापासून ज्या अवस्थेत आहे, तेच सांगण्यासाठी तुम्हाला पत्र लिहित आहे.
“कुस्ती खेळणाऱ्या आपल्या तरुणींनी गेल्या काही वर्षांमध्ये खूप काही भोगलंय. आमचा जीव गुदमरतोय. साक्षीने आता कुस्तीतून संन्यास घेतला आहे. तर आमचं शोषण करणारा सगळ्यांना सांगत फिरतोय की त्याचा कसा दबदबा आहे. त्याने याबाबत उद्धटपणे घोषणाबाजीदेखील केली”, अशी खंत विनेश फोगटने पत्राद्वारे व्यक्त केली.
आणखी वाचा >> “…तोवर पद्मश्री परत घेणार नाही”, कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बरखास्त झाल्यानंतर बजरंग पुनियाने स्पष्ट केली भूमिका
पत्रात पुढे म्हटले, “मोदीजी, तुम्ही तुमच्या आयुष्यातली केवळ पाच मिनिटं काढून त्या माणसाने गेल्या काही दिवसांत प्रसारमाध्यमांसमोर केलेली वक्तव्ये ऐका, तुम्हाला कळेल की त्याने काय केलं आहे. तो महिला कुस्तीपटूंना ‘मंथरा’ म्हणाला. महिला कुस्तीपटूंशी चुकीच्या पद्धतीने वागल्याची कबुली त्याने टीव्ही पत्रकारांसमोर दिली आहे. आम्हाला अपमानित करण्याची एकही संधी त्याने कधी सोडली नाही. याहून गंभीर बाब म्हणजे त्याने आतापर्यंत अनेक महिला कुस्तीपटूंना मागे हटण्यास भाग पाडलं. हे खूप क्लेशदायक आहे.”