Vinesh Phogat and Somvir Rathee’s love story: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सर्व भारतीयांच्या मनाला खोलवर जखम झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचं मैदान गाजवणाऱ्या भारताला बुधवारी मोठा धक्का बसला. फायनलपर्यंत धडक मारलेली व सुवर्ण पदकाची आशा जागवणारी कुस्तीपटू विनेश फोगाट हीच वजन १०० ग्रॅमने वाढल्याने तिला ऑलिम्पिकमधून बाद करण्यात आलं आहे. दरम्यान, सर्व देश तिच्या कामगिरीचे कौतुक करत असतानाच विनेशने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भावुक पोस्ट लिहीत कुस्तीला कायमचा अलविदा करत निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान यासगळ्यात तिचं कुटुंब आणि तिचा पती तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. विमानतळावर प्रपोज ते लग्नात ८ फेरे अशी एखाद्या बॉलिवूड चित्रपटासारखी विनेश फोगट आणि सोमवीर राठी यांची लव्हस्टोरी आहे.
पहिली भेट
विनेश आणि सोमवीर राठी यांची पहिली भेट २०११ मध्ये झाली होती. दोघेही रेल्वेत नोकरी करत होते. पूर्वी दोघे फक्त कामानिमित्त भेटत असत. मात्र, त्यांचे लवकरच मैत्री आणि नंतर प्रेमात रुपांतर झाले. विनेश फोगाटच्या नवऱ्याचं नाव सोमवीर राठी आहे. हरियाणाच्या जींद जिल्ह्यात राहणार सोमवीर सुद्धा राष्ट्रीय स्तरावरचा कुस्तीपटू राहिलेला आहे.
विमानतळावर प्रपोज
विनेशने २०१८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. इंडोनेशियामध्ये या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विनेश भारतात परतल्यावर सोमवीर राठीने सरप्राईज प्लॅन केला आणि दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विनेशला फिल्मी स्टाईल प्रपोज केलं. यानंतर डिसेंबर २०१८ मध्ये विनेश आणि सोमवीरचे लग्न झाले. या दोघांनी हरियाणातील चक्री दादरी येथे लग्न केले. यावेळी लग्नात फक्त जवळच्या लोकांना आमंत्रित करण्यात आले होते.
हेही वाचा >> Who is Dinshaw Pardiwala : विनेश फोगटला अंतिम सामना खेळता यावा यासाठी दिवस-रात्र मेहनत, कोण आहेत डॉ. दिनशॉ पारडीवाला?
लग्नात ७ फेरे नाही ८ फेरे घेतले
लग्नात ७ फेरे होतात पण विनेश आणि सोमवीरने ८ फेरे घेतले. जे एका विशिष्ट उद्देशासाठी समर्पित होते. या जोडप्याने आठवी फेरी “बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी खिलाओ” ला समर्पित केली.
कधीच कुठला सामना न हरलेल्या महिला कुस्तीपटूला हरवलेलं
सगळ्या भारताला विनेशकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. तिने तीन दिग्गज कुस्तीपटूंना नमवलं होतं. विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकमधील आपल्या मोहिमेची सुरुवातच सर्वांना आश्चर्यचा धक्का देऊन केली. विनेशने जगातील नंबर १ कुस्तीपटू युई सुसाकीला हरवलं. विनेशशी सामना होण्याआधी जापानची ही कुस्तीपटू कधीच कुठला सामना हरली नव्हती. तिच्या नावावर ८२-० चा रेकॉर्ड होता. पण विनेशने पहिल्याच सामन्यात तिला हरवलं. सेमीफायनलमध्ये तिने प्रतिस्पर्ध्यावर एकतर्फी विजय मिळवला. समोरच्या महिला कुस्तीपटूला रिंगमध्ये डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. विनेशने ५-० ने विजय मिळवला.