Vinesh Phogat post cryptic reaction Geeta Phogat husband Pawan Saroha : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट आज (शनिवार) सकाळी मायदेशी परतली आहे. विनेश फोगट दिल्लीच्या विमानतळावर पोहोचण्या अगोदर तिच्या स्वागतसाठी जनसमुदाय एकवटला होता. यावेळी भारतीय चाहत्यांनी केलेली गर्दी पाहून विनेश भावुक झाली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्यासोबत जे घडले, त्यानंतर विनेशने लोकांच्या आणि मीडियाच्या नजरेपासून स्वत:ला दूर ठेवले होते. तिने मायदेशी परतण्यापूर्वी फक्त इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे आपल्या मनातील भावना शेअर होत्या. चाहत्यांना तिची पोस्ट खूप आवडली पण या पोस्टने तिच्याच घरचे विनेशवर नाराज झाले. त्यांच्या नाराजीचे कारण काय होते? जाणून घेऊया.
विनेश फोगटने आपल्या पोस्टमधून सर्वांचे आभार मानले –
विनेश फोगटने एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, तिने तिच्या प्रवासाबद्दल तिच्या कुटुंबातील सदस्य, डॉक्टर, प्रायोजक आणि तिच्या प्रशिक्षकांचे आभार मानले. या सर्वांच्या मदतीनेच विनेशने तिच्या कारकिर्दीत आज जे काही मिळवले आहे, ते साध्य करता आल्याचे तिने सांगितले.
पवन सरोहाने काका महावीर यांची करून दिली आठवण –
विनेश फोगटच्या पोस्टमध्ये महावीर फोगट यांचे नाव नसल्याने गीता फोगटचा पती पवन सरोहाने नाराजी व्यक्त केली आहे. त्याने शुक्रवारी एक्सवर एक पोस्ट शेअर करुन आपली नाराजी व्यक्त केली. त्याने विनेशच्या पोस्टला प्रत्युत्तर देताना लिहिले की, ‘विनेश, तू खूप छान लिहिलं आहेस पण कदाचित आज तू तुझे काका महावीर फोगट यांना विसरली आहेस. ज्यांनी तुझ्या कुस्ती कारकिर्दीला सुरुवात करुन दिली होती. देव तुला सद्बुद्धी देवो.’
हेही वाचा – Vinesh Phogat : विनेश फोगट मायदेशी परतली; स्वागतासाठी जमलेला जनसमुदाय पाहून झाली भावुक, पाहा VIDEO
गीता फोगटने एक्सवर शेअर केली पोस्ट –
विनेश फोगटने इंन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केल्यानंतर काही वेळातच तिची बहीण गीता फोगटने एक्सवर एक पोस्ट केली. ज्यामध्ये तिने कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही, परंतु तिने केलेल्या पोस्टची वेळ पाहता लोक तिच्या पोस्ट संदर्भ विनेशशी जोडत आहेत. गीताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘कर्माची फळं आहे. छळाचं फळ छळच असेल. आज किंवा उद्या ते मिळणारच आहे.’
१०० ग्रॅम जास्त वजनाने विनेशचे पदक हुकले –
ऑलिम्पिक २०२४ मध्ये विनेश फोगटचे सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी १०० ग्रॅम जास्त वजन भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. यानंतर तिने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादामध्ये (सीएएस) संयुक्त रौप्य पदक मिळावे, अशी याचिका दाखल केली. तिची याचिका स्वीकारत त्यावर सुनावणीही सुरू झाली पण निकालाची तारीख मात्र पुढे ढकलली जात होती. १६ ऑगस्टला निकाल येईल असे क्रीडा लवादाने सांगितलेले असतानाच १४ ऑगस्टला तिची याचिका फेटाळल्याची माहिती देण्यात आली. यानंतर तिला पदक मिळेल याची आशा सरली.
© IE Online Media Services (P) Ltd