Vinesh Phogat Retirement : आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्याच फेरीत जागतिक विजेत्या आणि ऑलिम्पिकमधील गतविजेत्या जपनाच्या युई सुसाकीला हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती. आपली दमदार कामगिरी सुरू ठेवत विनेशने अंतिम फेरी गाठून इतिहास रचला. त्यामुळे यंदा सुवर्ण पदक येणारच, अशी ठाम धारणा तिच्यासह भारतीयांची झाली. परंतु, १०० ग्रॅम अधिकच्या वजनामुळे तिला रिकाम्या हातीच मायदेशी परतावे लागणार आहे.दरम्यान, हताश झालेल्या विनेशने आता निवृत्तीही जाहीर केली आहे. यावर तिचे प्रशिक्षक आणि काका महावीर फोगट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“२०२४ मध्ये तिचं सुवर्णपदक निश्चित होतं. परंतु, ती त्यापासून आता वंचित राहिली आहे. तिला अपात्र करण्यात आलं आहे. याजागी कोणीही असतं तरी दुःख झालंच असतं. प्रत्येकजण अशावेळी दुःख व्यक्त करतो. त्यामुळे तिने असा निर्णय घेतला आहे. ती भारतात परतली की आम्ही सर्व मिळून तिची समजूत काढणार आहोत. त्यानंतर निर्णय घेतला जाईल. २०२८ मध्ये पुन्हा खेळण्यासाठी तिला प्रोत्साहन देऊ. तिच्याशी फोनवर संवाद झालेला नाही”, असं तिचे काका महावीर फोगट म्हणाले.

विनेशची अलविदा पोस्ट

ऑलिम्पिकच्या कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या विनेश फोगाटचं वजन १५० ग्रॅमने जास्त भरलं त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं आणि तिचं सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. ज्यानंतर निराश झालेल्या विनेशने कुस्तीला अलविदा (Vinesh Phogat Retirement) केला आहे.

हेही वाचा >> Vinesh Phogat : विनेश फोगटचा कुस्तीला अलविदा! पोस्ट करत म्हणाली, “मी हरले आणि…”

“आई कुस्ती आज तू जिंकलीस आणि मी हरले. मला माफ कर आई, तुझं स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत आता माझ्यात नाही. माझ्यात आता तितकं बळच उरलं नाही. अलविदा कुस्ती २००१-२०२४ मी तुझी कायमच ऋणी राहिन मला माफ कर”, असं म्हणत कुस्तीला आई समान मानत विनेश फोगाटने कुस्तीतून संन्यास घेतला (Vinesh Phogat Retirement) आहे.

ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत जाऊनही वजनामुळे अपात्र ठरली विनेश

ऑलिम्पिकच्या स्पर्धेत विनेश फोगटनं तिच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना ५-० च्या फरकानं जिंकला. प्रतिस्पर्ध्यासाठी तिनं साधा एक गुणही सोडला नव्हता. त्यावेळी विनेशची (Vinesh Phogat) देहबोली प्रत्येक भारतीयाला जणू सांगत होती की, तयारी करा मी सुवर्ण पदक आणते आहे. त्यामुळे विनेश गोल्ड आणणारच ही खात्री जवळपास प्रत्येक भारतीयाला वाटलीच. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. पण, १५० ग्रॅम वजन पात्र ठरलं आणि विनेशला सुवर्ण पदकाच्या सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं. तिला लढायचं होतं, पण मैदानात येण्यापूर्वीच ती अपात्र ठरली.