Vinesh Phogat disclosure about joining politics : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक गमावल्यानंतर विनेश फोगटने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. भारतात परतल्यावर तिने कुस्तीत परत येण्याचे संकेत दिले होते, पण काही दिवसांनी तिने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची बातमी आली. आता ती हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवार आहे. कुस्तीतून निवृत्ती घेतल्यानंतर विनेशला तिचा निर्णय बदलण्याची, एनजीओ उघडण्याच्या, करोडो रुपयांचे प्रायोजकत्व मिळवण्याच्या ऑफर आल्या होत्या, पण तिने राजकारणी होण्याचा निर्णय का घेतला? याबाबत तिने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना खुलासा केला.
पदक गमावल्यापासून आतापर्यंतचा राजकीय अनुभव कसा आहे? असे विचारल्यावर विनेश फोगट म्हणाली, ‘मी राजकारणात न येण्याचा निर्णय घेतला होता. पण जेव्हा मी या मोठ्या लढ्याचा (निषेध) सामना करत होते, तेव्हा मला जाणवले की परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला राजकारणात यावे लागेल. मी राजकारणात आल्यावर माझ्याबद्दलची लोकांची सद्भावना संपेल, असे काहींनी मला सांगितले होते.’
महिलांकडून प्रेम आणि आदर वाढला –
विनेश फोगट पुढे म्हणाली, ‘पण तसे झाले नाही. मला एका मुलीसाठी आणि सूनेसाठी लोकांच्या भावना दिसत आहेत. यामध्ये विशेषत: महिलांकडून प्रेम आणि आदर वाढला आहे. त्या मला मिठी मारून आशीर्वाद देत आहे. राजकारणात येणे हा मोठा निर्णय होता, ही ईश्वराची इच्छा होती. त्यामुळे मी माझ्या नशिबाला अनुसरुन पावले टाकत आहे.’
कोणत्या गोष्टीने लोकांच्या मनात स्थान निर्माण केले?
पॅरिस ऑलिम्पिक पदक गमावणे की ब्रिजभूषण सिंग सारख्या शक्तिशाली राजकारण्याविरुद्ध तुमचा निषेध, कोणत्या गोष्टीने लोकांच्या मनात स्थान निर्माण केले? यावर विनेश फोगट म्हणाली, ‘मला वाटते निषेध. कारण लोकांना वाटते की आम्ही जे केले ते त्यांच्या मुली आणि त्यांच्या कुटुंबासाठी केले होते. तसेच ऑलिम्पिकमधील यश ही वैयक्तिक गोष्ट आहे.’
इतक्या प्रेमाची आणि पाठिंब्याची अपेक्षा नव्हती –
कुस्तीपटू पुढे म्हणाली, ‘जेव्हा आपण इतरांसाठी काही करतो, तेव्हा लोक तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. मला इतक्या प्रेमाची आणि पाठिंब्याची अपेक्षा नव्हती. आम्ही आंदोलन करत होतो, तेव्हा लोक येत-जात होते. पण ते शेतकरी आंदोलनासारखे जनआंदोलन ठरु शकले नाही, जिथे एका मोठ्या गटाने दोन वर्षे आंदोलन केले होते. आमचा लढा हा प्रत्येकाचा लढा नव्हता हे लक्षात आले. लोकांच्या स्वतःच्या मजबुरी आहेत, त्यांना नोकरी आणि वैयक्तिक बाबी हाताळाव्या लागतात.’