विनेशला रौप्य आणि साक्षीला कांस्यपदक; भारताच्या खात्यावर एकंदर सहा पदके
भारताचे आशास्थान असलेल्या नवज्योत कौरने ६५ किलो गटात सुवर्णपदक जिंकले आणि आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत इतिहास घडवला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकला ६२ किलो गटात कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले, तर विनेश फोगटने ५० किलो गटात रौप्यपदकावर नाव कोरले. या दोन पदकांमुळे भारताच्या खात्यावर एक सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य अशी सहा पदके जमा झाली आहे.
एकतर्फी झालेल्या अंतिम फेरीत २८ वर्षीय नवज्योतने जपानच्या मिया इमेईला ९-१ असे सहज हरवले. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. यापूर्वी तिने २०१३मध्ये आशियाई स्पर्धेत रौप्य व २०१४मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. साक्षीने कांस्यपदकाच्या लढतीत कझाकिस्तानच्या अयाल्यिम कासीमोवाला १०-७ असे संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभूत केले.
राष्ट्रकुल क्रीडा विजेती खेळाडू विनेशला चीनच्या चुआन लेईने अंतिम लढतीत ३-२ असे पराभूत केले. विनेशने लेईला चांगली लढत दिली. ०-१ अशा पिछाडीवरून तिने दोन गुण घेत आघाडीही मिळवली होती. मात्र शेवटची दोन मिनिटे बाकी असताना लेईने सुरेख डाव टाकून दोन गुण वसूल केले व ३-२ अशी आघाडी मिळवली. भारताच्या संगीता कुमारीने ५९ किलो गटांत कांस्यपदक मिळवले. तिने कांस्यपदकाच्या लढतीत कोरियन खेळाडू जिऊन उमला पराभूत केले. दिव्या काक्रनला ६८ किलो गटात कांस्यपदकापासून वंचित रहावे लागले. तिला किर्गिझस्तानच्या मिरीम झुमानरोवाने पराभूत केले.
आशियाई स्पर्धेत मला सोनेरी कामगिरी अपेक्षित होती. रौप्यपदकावर मी समाधानी नाही. चीनची खेळाडू खूप ताकदवान होती तरीही मी तिला जिद्दीने लढत दिली. आघाडी टिकवण्यात मला यश मिळाले नाही. अर्थात या रौप्यपदकाचा मला या वर्षी होणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण स्पर्धासाठी फायदा होणार आहे. – विनेश फोगट