Antim Panghal raises question on Vinesh Phogat direct entry to Asian Games: भारतीय कुस्तीतील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता भारतीय कुस्ती महासंघ (डब्ल्यूएफआय) हंगामी समितीने मंगळवारी ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया आणि जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगाट यांना आशियाई क्रीडा स्पर्धेत थेट प्रवेश मंजूर केला. हा निर्णय अनेक कुस्तीपटू आणि प्रशिक्षकांना आवडला नाही. कुस्तीपटू अंतिम पंघालने विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. तिने एक व्हिडीओच्या माध्यामातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंतिमने एका व्हिडीओच्या माध्यामातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, “विनेशने गेल्या एक वर्षापासून सराव केला नसला, तरीही तिला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी थेट प्रवेश देण्यात आला आहे. मी २०२२ च्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या चाचण्यांमध्येही आमचा सामना ३-३ असा बरोबरीत राहिला होता. तेव्हा ही माझी फसवणूक झाली आणि माझा पराभव झाला. मी कुस्ती सोडली पाहिजे का? मला फक्त निष्पक्ष चाचणी हवी आहे. मी असे म्हणत नाही की, फक्त मीच तिला पराभूत करू शकते, अनेक महिला कुस्तीपटू हे करू शकतात.”

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) हंगामी समितीने मंगळवारी केडी जाधव इनडोअर स्टेडियमवर २२ आणि २३ जुलै रोजी चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये विनेश आणि बजरंग सहभागी होणार नाहीत. कुस्तीपटू बजरंग (६५) आणि विनेश फोगाट (५३ किलो), ज्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत, त्यांना चाचणीशिवाय आशियाई खेळांच्या संघात समाविष्ट करण्यात आले आहे. हंगामी समितीने संघाच्या मुख्य प्रशिक्षकांच्या इच्छेविरुद्ध या दोघांनाही संघात स्थान दिले आहे. या निर्णयाविरोधात या दोन्ही वजन गटातील इतर कुस्तीपटूंमध्ये नाराजी आहे.

प्रशिक्षक म्हणाले, सूट देण्यास विरोध केला होता –

हंगामी समितीने २२ आणि २३ जुलै रोजी होणाऱ्या चाचण्यांच्या चार दिवस आधी आपल्या निकषांचे परिपत्रक जारी केले होते, ज्यामध्ये बजरंग आणि विनेशचे नाव न घेता, ६५ आणि ५३ या वजनाच्या श्रेणींमध्ये कुस्तीपटूंची निवड केली जाईल, असे म्हटले होते. समितीच्या एका सदस्याने सांगितले की, २२ आणि २३ तारखेला फ्रीस्टाइल, ग्रीको रोमन आणि महिला गटाच्या सहाही वजनी गटात चाचणी होईल. पुरुषांच्या ६५ आणि महिलांच्या ५३ वजनी गटातील विजेत्या कुस्तीपटूचे नाव एशियाडसाठी स्टँडबाय म्हणून पाठवले जाईल. जर बजरंग आणि विनेश एशियाडमध्ये खेळले नाहीत, तर दोघांनाही संघात स्टँडबाय ठेवण्यात येईल.

पुरुष आणि महिला संघांचे मुख्य प्रशिक्षक जगमिंदर सिंग आणि वीरेंद्र दहिया यांनी सांगितले की, त्यांना या बैठकीला आमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यांनी दोघांनाही सूट देण्यास विरोध केला होता, मात्र समितीने दोघांचाही संघात समावेश केला.

हेही वाचा – बजरंग, विनेशला थेट प्रवेश; आशियाई स्पर्धेसाठी हंगामी समितीचा आश्चर्यकारक निर्णय

रवीला मिळाली नाही सूट –

डब्ल्यूएफआयच्या निवड धोरणानुसार, बजरंग, विनेश आणि रवी कुमार यांना ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेते म्हणून संघात थेट प्रवेश द्यायचा होता, परंतु रवीला दुखापतीमुळे चौथ्या मानांकन स्पर्धेत मुकावे लागले. त्यामुळे ही सूट देण्यात आली नाही. बजरंग आणि विनेशसह साक्षी मलिक, संगीता फोगाट, जितेंदर कुमार, सत्यव्रत कादियान हे ट्रायलमध्ये खेळणार की नाही, हे अद्याप ठरलेले नाही. हे चौघेही सध्या परदेशात तयारी करत आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinesh phogat shared a video while attending the antim panghal as he got direct entry to the asian games vbm
Show comments