पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वादग्रस्त माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय असलेल्या संजय सिंह यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) अध्यक्षपदी निवड झाल्याने भविष्यातही महिला कुस्तीगिरांना शोषणाला सामोरे जावे लागण्याची भीती कायम आहे, असे वक्तव्य राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेती कुस्तीगीर विनेश फोगटने केली.

या वर्षांच्या सुरुवातीपासून चर्चेत राहिलेल्या भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक अखेर गुरुवारी पार पाडली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संजय सिंह यांनी माजी कुस्तीगीर अनिता श्योरण यांचा ४० विरुद्ध सात मतांनी पराभव केला. ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाचे आरोप करताना विनेश, साक्षी मलिक आणि बजरंग पुनियासह भारताच्या आघाडीच्या कुस्तीगिरांनी वर्षांच्या सुरुवातीला दिल्लीत आंदोलन केले होते. आता ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय असलेल्या संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने महिला कुस्तीगिरांच्या सुरक्षेची चिंता कायम असल्याचे मत विनेशने व्यक्त केले.

‘‘मी बजरंगसोबत गृहमंत्र्यांची भेट घेतली होती. महिला कुस्तीगिरांची नावे आणि त्यांना काय भोगावे लागले आहे, याबाबत आम्ही त्यांना सांगितले होते. या प्रकरणात लक्ष घालण्याची आम्ही त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिले होते. मात्र, तीन-चार महिने झाले तरी काहीही घडले नाही. त्यामुळे आम्ही जंतर-मंतर येथे आंदोलन पुकारले होते,’’ असे विनेश म्हणाली.

हेही वाचा >>>IND vs SA : तिसऱ्या सामन्यात सॅमसन-अर्शदीपची कमाल! भारताची दक्षिण आफ्रिकेवर ७८ धावांनी मात, मालिका २-१ ने जिंकली

‘‘संजय सिंहसारख्या व्यक्तीची अध्यक्षपदी निवड होणे ही फारच दु:खद बाब आहे. त्यांच्या निवडीमुळे भविष्यातही महिला कुस्तीगिरांच्या शोषणाची भीती आहे. यापूर्वी जे बंद दारामागे घडत होते, ते आता सर्वासमोर घडेल. या देशात न्याय कसा मिळवायचा हे ठाऊक नाही. कुस्तीचे भविष्य अंधारात आहे,’’ अशी प्रतिक्रिया विनेशने व्यक्त केली.

सरकारने शब्द पाळला नाही -बजरंग

क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी ब्रिजभूषण यांचे कुटुंबीय किंवा त्यांच्या जवळील व्यक्तींना महासंघाची निवडणूक लढण्यास परवानगी देणार नसल्याची शाश्वती दिल्यानंतरच कुस्तीगिरांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र, आता ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय असलेल्या संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने सरकारने आपला शब्द न पाळल्याची आमची भावना असल्याचे बजरंग पुनिया म्हणाला. ‘‘संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड होणे हे दुर्दैवी आहे. त्यांच्या निवडीमुळे आता महिला कुस्तीगिरांना न्याय मिळण्याच्या आशा अधिकच धुसर झाल्या आहेत. १५ ते २० मुली क्रीडामंत्र्यांना भेटल्या आणि त्यांना आलेले अनुभव सांगितले. आता यापैकी केवळ सहा मुली ठामपणे उभ्या आहेत, पण त्या किती काळ ठाम राहतील हे सांगणे अवघड आहे,’’ असेही बजरंगने नमूद केले.

हेही वाचा >>>Zimbabwe Cricket : झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने बंदी असलेल्या औषधांचे सेवन केल्यामुळे दोन खेळाडूंना केले निलंबित

जागतिक संघटना बंदी उठवणार?

भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक विविध कारणांनी लांबणीवर पडल्यामुळे महासंघावर संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेने (यूडब्ल्यूडब्ल्यू) बंदी घातली होती. त्यामुळे भारतीय कुस्तीगिरांना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत जागतिक संघटनेच्या ध्वजाखाली खेळावे लागले होते. मात्र, आता भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडल्याने जागतिक संघटनेकडून घालण्यात आलेली बंदी उठवण्यात येण्याची शक्यता आहे.

ब्रिजभूषण यांच्या गटाला १५ पैकी १३ पदे

ब्रिजभूषण गटाने १५ पैकी १३ जागा जिंकून महासंघावरील आपले वर्चस्व कायम ठेवले. ब्रिजभूषण गटातील संजय सिंह यांनी अध्यक्षपद मिळवले, तर दिल्लीचे जय प्रकाश (३७ मते), पश्चिम बंगालचे असित कुमार साहा (४२), पंजाबचे कर्तार सिंग (४४) आणि मणिपूरचे एन. फोनी (३८) यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. मध्य प्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री मोहन यादव यांना उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत केवळ पाच मते मिळाली. उत्तराखंडचे सत्यपाल सिंह देशवाल यांनी जम्मू आणि काश्मीरच्या दुष्यंत शर्मा यांचा ३४-१२ असा पराभव करताना कोषाध्यक्ष हे पद मिळवले. कार्यकारी समितीतील पाचही स्थानांवर ब्रिजभूषण यांच्या गटातील व्यक्तींची निवड झाली. अनिता श्योरण यांना अध्यक्षपद मिळवता आले नसले, तरी त्यांच्या गटातील प्रेमचंद लोचाब यांनी सरचिटणीस हे महत्त्वाचे पद मिळवले. आंदोलनकर्त्यां कुस्तीगिरांच्या जवळचे मानले जाणारे देवेंदर सिंह कडियन यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाली. 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinesh phogat statement after the election of sanjay singh as the president of the wrestling federation amy