Vinesh Phogat Gold Medal News: भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सलग तीन सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. पण अंतिम फेरीत तिचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा (५० किलो) १०० ग्रॅम जास्त होते, त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले ज्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून ती बाहेर पडली. यानंतर तिने कुस्तीतून निवृत्ती घेण्याचा निर्णयही घेतला आहे. दरम्यान, हरियाणाच्या जनतेने मोठा निर्णय घेतला आहे.
विनेश फोगटला कोण देणार सुवर्णपदक?
अतिरिक्त वजनामुळे विनेशला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आले यानंतर तिने न डगमगता संयुक्त रौप्य पदक मिळावे यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे अपील केले आहे. या प्रकरणाची सुनावणीही सुरू आहे. पण या दरम्यानच विनेश फोगटबाबत सर्व खापच्या वतीने महापंचायत घेण्यात आली. या महापंचायतीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विनेश भारतात परतल्यावर खाप पंचायत तिचे स्वागत मोठ्या थाटात स्वागत करेल. यादरम्यान विनेश फोगटला सर्व खापच्या वतीने सुवर्णपदक देण्यात येणार आहे.
सर्वखाप पंचायतीने ट्विट करून याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘सर्वखाप पंचायतीने एक मोठा निर्णय घेतला आहे. विनेश भारतात परतल्यावर एक भव्य समारंभ आयोजित केला जाईल आणि सर्वखाप पंचायत विनेशला सुवर्णपदक देईल. ‘माझी मुलगी ही माझा अभिमान आहे.’ – सर्वखाप पंचायत.
Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिकमधील वाटचाल
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटने शानदार सुरुवात केली होती. उपउपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना जपानची स्टार खेळाडू आणि वर्ल्ड चॅम्पियन सुसाकीशी झाला. विनेश फोगटने या चार वेळच्या विश्वविजेत्या कुस्तीपटूला पराभूत करून मोठा अपसेट निर्माण केला. सुसाकीनंतर विनेशने माजी युरोपियन चॅम्पियन युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा पराभव केला. उपांत्य फेरीत तिने पॅन अमेरिकन गेम्स चॅम्पियन क्युबाच्या युस्नेलिस गुझमनचा पराभव केला. अंतिम फेरीत तिचा सामना अमेरिकेच्या सहाव्या मानांकित सारा हिल्डब्रँडशी होणार होता. पण सामन्यापूर्वीच तिला अपात्र ठरवण्यात आले.
हेही वाचा – “ऑफर चांगली आहे पण…”ऑलिम्पिक पदक विजेता सरबज्योत सिंगने का नाकारली सरकारी नोकरीची ऑफर, पाहा काय म्हणाला?
विनेश फोगटने अंतिम फेरीत अपात्रतेच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. तिने सीएएसकडे अपील केले आहे आणि या प्रकरणी १३ ऑगस्टपर्यंत निर्णय येऊ शकतो. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला एकही सुवर्णपदक जिंकता आलेले नाही. यावेळी भारताच्या खात्यात ५ कांस्य आणि १ रौप्य पदक आहे. विनेशला रौप्यपदक मिळाल्यास या ऑलिम्पिकमध्ये भारताची ७ पदके असतील.