बेलग्रेड :भारताच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या विनेश फोगटने (५३ किलो) जागतिक स्पर्धेत बुधवारी कांस्यपदकाची कमाई केली. यंदाच्या स्पर्धेतील हे भारताचे पहिलेच पदक ठरले. पात्रता फेरीतील पराभवानंतरही मिळालेली संधी विनेश फोगटने अचूक साधली. याशिवाय निशा दहियाला (६८ किलो) अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.

विनेशने पात्रता फेरी गमावल्यानंतरही कांस्यपदकाच्या लढतीपर्यंत मजल मारली. मंगोलियाच्या खुलन बटखुयागकडून तिला पराभव पत्करावा लागला होता. खुलनने अंतिम फेरीपर्यंत धडक मारल्यामुळे रेपिचेज गटातून विनेशचे आव्हान कायम राहिले. रेपिचेज गटात अझरबैझानच्या लैला गुरबार्नोवियाने दुखापतीमुळे तिला पुढे चाल मिळाली. कांस्यपदकाच्या लढतीत विनेशने स्वीडनच्या बलाढय़ एम्मा माल्मर्गेनचा ८-० असा पराभव केला. एम्माने विनेशविरुद्ध दुहेरीपटाचे आक्रमण केले होते. मात्र, त्यास दाद न देता विनेशने एक चाक डावावर दोनदा दोन गुणांची कमाई केली. त्यानंतर दुहेरी पटाचा डाव टाकून तिने आणखी दोन गुणांची कमाई केली. अखेरच्या टप्प्यात बगलडूब डाव टाकून विनेशने एम्माला निष्प्रभ केले. या डावावर विनेशने आणखी दोन गुणांची कमाई करून कांस्यपदकावर मोहोर उमटवली.

“७२ तासांत…”, विनेश फोगाटच्या आरोपानंतर कुस्ती महासंघाला क्रीडा मंत्रालयाचे निर्देश

निशाने पात्रता फेरीत लिथुआनियाच्या डानुटे डॉमीकाटय़ेटेचा तांत्रिक आघाडीवर पराभव करून आपल्या मोहिमेस सुरुवात केली. त्यानंतर निशाने चेक प्रजासत्ताकच्या अडेला हझलोकोवाला १३-८ असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत  निशाने बल्गेरियाच्या सोफिया जॉर्जिएवाचे आव्हान ११-० असे  संपुष्टात आणले. उपांत्य फेरीत निशाला जपानच्या एमी इशीकडून गुणांवर ४-५ असा पराभव पत्करावा लागला. आता निशा गुरुवारी कांस्यपदकासाठी खेळेल.

दंगल गर्ल : विनेश फोगट

जागतिक स्पर्धेतील विनेशचे हे दुसरे कांस्यपदक ठरले. यापूर्वी २०१९मध्ये कझाकस्तान येथे झालेल्या स्पर्धेतही विनेश कांस्यपदकाची मानकरी ठरली होती.

Story img Loader