नवी दिल्ली : गुडघ्याच्या दुखापतीमुळे विनेश फोगटने आशियाई कुस्ती स्पर्धेतून माघार घेतली असून, जागतिक स्पर्धेसही तिला मुकावे लागणार आहे. त्याचबरोबर अन्य प्रमुख मल्लांच्या उपलब्धतेविषयी काहीच माहिती समोर न आल्याने जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणीचे निकष बदलणार, अशा चर्चेने जोर धरला आहे; पण काही झाले तरी चाचणी निकषात बदल होणार नाही, असे सांगून हंगामी समितीने या चर्चेवर सध्या तरी पडदा पडल्याचे दाखवले आहे. या स्पर्धेसाठी निवड चाचणी २५-२६ ऑगस्टला पतियाळा येथे होणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी बजरंग पुनिया आणि विनेश फोगट या प्रमुख मल्लांना हंगामी समितीने संघात थेट प्रवेश दिला होता. मात्र, यानंतर समितीवर चहूबाजूंनी टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर जागतिक स्पर्धेसाठी सर्व स्तरांवरील मल्लांना निवड चाचणी अनिवार्य असेल, असे हंगामी समितीने जाहीर केले आहे. या दरम्यान गुडघ्याच्या दुखापतीमुळे विनेश फोगटने आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे. गुडघ्यावरील उपचारासाठी शस्त्रक्रिया आवश्यक असल्याने जागतिक स्पर्धेलाही विनेशला मुकावे लागणार आहे.
विनेशच्या माघारीनंतर अन्य प्रमुख मल्लांच्या उपलब्धतेविषयीदेखील काहीच माहिती समोर न आल्यामुळे हंगामी समिती आता फक्त ऑलिम्पिकमध्ये समावेश नसलेल्या गटासाठीच निवड चाचणी घेणार अशा चर्चेला सुरुवात झाली होती. जागतिक स्पर्धेसाठी १०, तर ऑलिम्पिकसाठी सहा वजनी गट असतात. यातील सहा वजनी गट आशियाई स्पर्धेतही कायम असतात. त्यामुळे आशियाई स्पर्धेसाठी यापूर्वीच चाचणी झाली असल्यामुळे नव्याने चाचणी घेण्याची गरज नाही, असा मतप्रवाह पुढे येत होता.