Vinod Kambli Health Update and Statement on Sachin Tendulkar: भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला शनिवारी अचानक रूग्णालयात दाखल केले. मेडिकल रिपोर्टनंतर विनोद कांबळीच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी असल्याचे डॉक्टरने सांगितले. आता विनोद कांबळी यांची स्थिती स्थिर असल्याचे त्यांनी स्वत: सांगितले. एएनआयने शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये आपल्या तब्येतीचे अपडेट देताना विनोद कांबळी दिसत आहेत. यादरम्यान त्यांनी सचिन तेंडुलकरवरही मोठं वक्तव्य केलं आहे.
सचिन तेंडुलकर आणि त्याचा जिगरी दोस्त विनोद कांबळी अगदी लहानपणापासून रमाकांत आचरेकर सर यांच्याकडे क्रिकेट शिकले आणि मग भारतीय क्रिकेट संघापर्यंत त्यांचा प्रवास झाला. आता हॉस्पिटलमध्ये असतानाही विनोद कांबळीने सचिन तेंडुलकरचे आभार मानले आहेत.
विनोद कांबळी यांनी हॉस्पिटलमध्ये असतानाच एएनआयला मुलाखत दिली. सचिनचे आभारी असल्याचे विनोद कांबळी यांनी सांगितले. त्याचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव सोबत आहेत. त्यांनी त्यांचे प्रशिक्षक आणि गुरू आचरेकर सरांचे नावही घेतले आणि आमच्या मैत्रीत त्यांचाही मोठा वाटा असल्याचे सांगितले. विनोद कांबळी म्हणाले, मी सचिन तेंडुलकरचा खूप आभारी आहे, त्याचं प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहेत.
याचबरोबर विनोद कांबळीने We Are The Champions गाणं गायलं आणि कधीही हार मानत नसल्याचं सांगितलं. विनोद कांबळी यांनी मुलाखतीत सांगितले की, आता पूर्वीपेक्षा बरे वाटत असून येत्या २ ते ३ दिवसांत डिस्चार्ज मिळेल अशी आशा व्यक्त केली. क्रिकेट सोडण्याबाबत कांबळी म्हणाले की, याचबरोबर मी क्रिकेट खेळणं कधीचं सोडलं नाही, कारण मी केलेली शतकं आणि द्विशतकं कायम माझ्या लक्षात आहेत.
विनोद कांबळीने असंही सांगितले की त्याच्या कुटुंबात ते एकमेव डावखुरे फलंदाजी नाहीत. तर त्यांच्या घरात ३ डावखुरे फलंदाज आहेत. रूग्णालयात बाजूला उभा असलेला मुलगा आणि त्यांचा मुलगाही डावखुरा फलंदाज असल्याचे सांगितले. विनोद कांबळी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शनिवारी रात्री ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. कांबळी आपल्या प्रकृतीबाबत सतत चिंतेत असतात. गेल्या महिन्यातही प्रकृतीमुळे त्यांना तीनदा रुग्णालयात जावे लागले होते.