Vinod Kambli Admitted to Hospital: टीम इंडियाचे माजी फलंदाज विनोद कांबळी यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. शनिवारी (२१ डिसेंबर) रात्री उशिरा त्यांना ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टर त्यांची काळजी घेत आहेत. त्याच्या सर्व आवश्यक चाचण्या केल्या जात आहेत. सध्या ते ठिक असले तरी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. याचबरोबर विनोद कांबळींना रूग्णालयात दाखल केल्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर काही चाहत्यांनी व्हीडिओदेखील काढला आहे.
ठाण्यातील कशेळी येथील आकृती रुग्णालयात भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू विनोद कांबळी यांना उपचारासाठी दाखल केले आहे. दोन दिवसांपूर्वी चक्कर येऊन ते पडले होते त्यानंतर तपासणी केली असता त्यांना कावीळ व व्हायरल इन्फेक्शन असल्याचे समजले तसेच मेंदूला देखील थोड्याफार प्रमाणात सूज आल्याचे डॉक्टरांनी त्यावेळी सांगितले. त्यामुळे त्यांना गेले दोन दिवसापासून ऍडमिट करण्यात आले असून सध्या त्यांचे प्रकृती ठीक आहे अजून पाच ते सहा दिवसानंतर ते पूर्ववत होतील, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा – VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
नुकताच विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये तो सचिन तेंडुलकरशी बोलताना दिसला. यादरम्यान त्यांची प्रकृती ठीक नव्हती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक माजी भारतीय खेळाडू त्याच्या मदतीसाठी पुढे आले. दरम्यान विनोद कांबळी यांनी एक मुलाखतही दिली होती, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती दिली होती.
हेही वाचा – PV Sindhu Wedding: पीव्ही सिंधूने बांधली लग्नगाठ, विवाह सोहळ्यातील पहिला फोटो आला समोर
हृदयविकाराबरोबरच कांबळी इतर समस्यांमधूनही जात आहे. यापूर्वीही त्यांची प्रकृती खालावली होती. आता पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, कांबळीने त्याच्या मानसिक आरोग्य आणि मद्यपान यांच्या संघर्षांबद्दल खुलेपणाने सांगितले आहे, या दोन्ही गोष्टींचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर दिसून आला आहे.
विनोद कांबळीचं हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर वक्तव्य
“डॉक्टर माझ्यासाठी देव आहेत, मरणाच्या दारातून मी आलो आहे, मी पुन्हा उभा राहील आणि पुन्हा लवकरच क्रिकेटच्या मैदानात दिसेल, मी अजून मेलो नाही,जिवंत आहे आणि मरणारही नाही, मी सचिन तेंडुलकर सोबत पुन्हा क्रिकेट खेळताना दिसेन, सचिन तेंडुलकरला देखील माझा हाच निरोप आहे,” असं विनोद कांबळी म्हणाले.
विनोद कांबळीने १९९१ मध्ये भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी १९९३ मध्ये टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केले. विनोद कांबळीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची दमदार सुरुवात केली होती. भारताकडून सर्वात जलद १ हजार कसोटी धावा करणारा फलंदाज ठरले होते.. अवघ्या १४ डावात त्यांनी ही कामगिरी केली.
विनोद कांबळीने भारतीय संघासाठी १७ कसोटी सामन्यांमध्ये एकूण १०८४ धावा केल्या आहेत, ज्यात ४ शतकं आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, त्याने टीम इंडियासाठी १०४ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण २४७७ धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. २००० च्या दशकात त्यांची कामगिरी खूपच खराब राहिली आणि त्यामुळे त्यांना टीम इंडियातून वगळण्यात आले होते.