Vinod Kambli on Wife Andrea: दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या जयंतीनिमित्त दादरच्या शिवाजी पार्क येथे आचरेकर यांच्या स्मारकाचं उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांचे एकेकाळचे शिष्य असलेले सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी एकत्र एका मंचावर उपस्थित होते. यावेळी विनोद कांबळी यांनी गुरू आचरेकर यांच्यासाठी एक गाणंही गायलं. बोबडे बोल आणि उठताही येत नसलेल्या विनोद कांबळी यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होत्या. यानंतर आता विनोद कांबळी यांनी एका युट्यूब चॅनेलला आपल्या स्वभावाप्रमाणे बेधडक मुलाखत दिली असून आजारपण, डळमळलेली आर्थिक परिस्थिती, कुटुंबाची साथ, सचिन तेंडुलकरची मैत्री याबाबत स्पष्टपणे भूमिका मांडली आहे.

विकी ललवानी यांच्या युट्यूब चॅनेलला विनोद कांबळी यांनी नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी कुटुंबाबत भाष्य केले. यावेळी त्यांना चित्रपटांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, मी दिलीप कुमार यांचा चाहता आहे. त्यांना मी भेटलेलोही होतो. त्यांचे सर्व चित्रपट पाहिले आहेत. कोणती अभिनेत्री आवडते? या प्रश्नावर विनोद कांबळी लाजले आणि त्यांनी पत्नी अँड्रियाचा अभिनय आवडतो असे सांगितले.

हे वाचा >> Vinod Kambli: “माझा मुलगा डावखुरा फलंदाज, तोही माझ्यासारखाच…”, विनोद कांबळी आजारपणात कुटुंबाबाबत काय म्हणाले?

पत्नी अँड्रियाशी लग्न कसे झाले?

आपल्या लग्नाबाबत सांगताना विनोद कांबळी यांनी गमतीशीर किस्सा सांगितला. ते म्हणाले, वांद्र्यातून जात असताना मी पहिल्यांदा तिला पोस्टरवर पाहिले होते. ती फॅशन मॉडेल होती. पोस्टरवर तिला पाहून मी तिथल्या तिथे मित्राला म्हणालो की, मी हिच्याशी लग्न करणार. ख्रिसमसच्या वेळेला मी अँड्रियाला पहिल्यांदा भेटलो. त्यानंतर आम्ही बरेच दिवस भेटत होतो. तेव्हा कुठे जाऊन आमचे लग्न झाले. मला आयुष्यात अँड्रिया सारखी पत्नी मिळाली, हे माझे भाग्य समजतो.

अँड्रिया आणि विनोद कांबळी हे २००० साली एकमेकांना भेटले. त्यानंतर सहा वर्ष डेट केल्यानंतर २००६ साली त्यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केले. २०१० साली त्यांना जिजस क्रिस्टियानो नावाचा मुलगा झाला. तर २०१४ साली जोहाना नावाची मुलगी झाली. २०२३ साली अँड्रिया चर्चेत आली होती. विनोद कांबळीने मारहाण केल्याचा आरोप तिने केला होता. त्यानंतर ते दोघेही वेगवेगळे राहत असल्याची चर्चा होती. मात्र विकी ललवानी यांना दिलेल्या मुलाखतीत या कठीण काळात पत्नी खंबीरपणे पाठिशी उभी असल्याचे ते म्हणाले.

पहिल्या पत्नीबाबत म्हणाले…

विनोद कांबळी यांचे हे दुसरे लग्न होते. पहिल्या पत्नीबाबत त्यांना मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, पहिली पत्नी नोएला लुईसशी आता माझा संपर्क नाही. अँड्रिया ही नोएलाशी बोलते, पण माझा आता तिच्याशी संपर्क नाही.

Story img Loader