Wankhede Stadium Vinod Kambli Video Viral : मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या ५० व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला मुंबईचे सर्व दिग्गज क्रिकेटपटू नुकतेच उपस्थित होते. टीम इंडियाचा माजी फलंदाज विनोद कांबळीही या सोहळ्याला उपस्थित होता. यावेळी त्याला नीट चालताही येत नसताना त्यान्या आपल्या कृतीने उपस्थित असलेल्या सर्वांची मनं जिंकली. ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
विनोद कांबळीने जिंकली सर्वांची मनं –
विविध आजारांनी त्रस्त असलेल्या कांबळीला नुकताच काही दिवसांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला होता. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला कांबळी पहिल्यांदाच वानखेडे स्टेडियमच्या सोहळ्यातून सार्वजनिकरित्या दिसला. यादरम्यान कांबळीने टीम इंडियाचा माजी फलंदाज सुनील गावस्कर यांच्या पायाला स्पर्श केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कांबळीने सुनील गावस्करांचा घेतला आशीर्वाद –
नुकतेच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या कांबळीला नीट चालता येत नव्हते, तरीही त्याने महान सुनील गावस्कर यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विनोद कांबळी पहिल्यांदा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरला भेटतो. त्यानंतर तो माजी फलंदाज वसीम जाफरला भेटतो. यानंतर तो सुनील गावस्कर यांच्याकडे जातो. यावेळी कांबळीला चालण्यात खूप त्रास होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
विनोद कांबळीचा व्हिडीओ होतोय व्हायरल –
विनोद कांबळीला एकट्याला चालत येत नसल्याचे पाहून दोघांनी त्याचा हात धरला आणि सुनील गावस्कर यांच्याकडे नेले. प्रथम कांबळीने दिग्गज गावस्कर यांच्याशी हस्तांदोलन केले आणि नंतर त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला. यानंतर कार्यक्रमात कांबळी यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर दोघांनी कांबळीला पकडून मागे बसवले.
डिसेंबरमध्ये विनोद कांबळीची प्रकृती खालावली होती –
डिसेंबरच्या अखेरीस विनोद कांबळीची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्याला भिवंडीतील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे सुमारे १० दिवस उपचार घेतल्यानंतर, माजी भारतीय क्रिकेटरला १ जानेवारी रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. विनोद कांबळीला आरोग्याच्या विविध समस्या आहेत.