नव्या वर्षांत प्रत्येकाचा काही ना काही तरी संकल्प असतो. प्रीमिअर फुटबॉल लीगमध्ये सध्या आर्सेनलचा संघ अव्वल स्थानावर असून स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचा त्यांचा संकल्प असेल. २००४ सालानंतर त्यांना एकदाही या स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही.
आर्सेनलचे प्रशिक्षक अर्सेन वेंगर यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने कामगिरीत सातत्य राखले आहे. त्यामुळे तेच या वर्षी जेतेपदाचे दावेदार असतील, असे म्हटले जात आहे; पण आर्सेनलला लिव्हरपूल, मँचेस्टर युनायटेड, चेल्सी यांचेही कडवे आव्हान असेल. जर्गन क्लोप यांच्या मार्गदर्शनाखाली लिव्हरपूलने चांगली कामगिरी केली आहे.
‘‘संघातील खेळाडू परिपूर्ण आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीची जाण आहे. स्पर्धेमध्ये प्रतिस्पध्र्याला कडवी झुंज देऊन नामोहरम कसे करता येईल, हे खेळाडूंनी दाखवून दिले आहे,’’ असे वेंगर म्हणाले.
शनिवारी आर्सेनल आणि न्यूकॅसल युनायटेड यांच्यामध्ये सामना होणार आहे. हा सामना आर्सेनलसाठी जास्त कठीण नसेल, कारण आर्सेनल अव्वल स्थानावर आहे, तर न्यूकॅसलचा संघ शेवटून तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे आर्सेनलने कामगिरीत सातत्य राखल्यास त्यांना विजय मिळवता येऊ शकतो.
‘‘वर्ष संपल्यावर एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे आम्ही वर्षभर सर्वस्व खेळाला अर्पण केले आहे. हीच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आतापर्यंत आम्ही लीगचे जेतेपद पटकावलेले नाही, पण त्याच्या समीप नक्कीच आहोत. आकडेवारीवर नजर टाकली तर आम्ही जेतेपदाच्या फार जवळ आहोत,’’ असे वेंगर म्हणाले.