Virat Kohli : २३ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना सगळ्या देशासाठी अस्मितेचा विषय होता. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानला अवघ्या २४१ धावाच करता आल्या. भारताने या लक्ष्याचा पाठलाग करताना सहा गडी राखून पाकिस्तानवर विजय मिळवला. दुबईत झालेल्या या सामन्यात विराटने शतकी खेळी केली. यानंतर विराटने केलेली कृती चर्चेत आली आहे.
विराटची अप्रतिम खेळी
विराट कोहलीचं शतक दुबईतल्या सामन्यात होईल की नाही? असं सगळ्यांनाच वाटत होतं. ९६ वर नाबाद असताना विराट कोहलीने चौकार मारला. त्यानंतर विराटचं शतकही झालं आणि भारताने सामनाही जिंकला. विराट कोहलीला किंग कोहली असं म्हणत त्याच्या या शतकी खेळीचं कौतुक नेटकऱ्यांनी करण्यास सुरुवात केली. विराटलाही या खेळीनंतर खूप आनंद झाला. ७ चौकार मारत त्याने पाकिस्तानच्या विरोधात शतक ठोकलं. विराट कोहलीने शतक झाल्यानंतर झालेला आनंद बॅट उंचावून साजरा केला. त्यानंतर डोक्यातलं हेल्मेट काढलं आणि गळ्यातलं लॉकेट काढून त्या लॉकेटचं एकदा नाही तर दोन ते तीनवेळा चुंबन घेतलं. विराटचं शतक झालं की तो ही कृती करतो हे २०१८ पासून क्रिकेट रसिक पाहात आले आहेत. या सामन्यानंतर आता विराटच्या या कृतीची पुन्हा चर्चा होते आहे. तसंच यामागे एक खास कारण आहे तेदेखील अनुष्का शर्माशी संबंधित आहे हे समोर आलं आहे.
विराट शतक किंवा चांगल्या कामगिरीनंतर गळ्यातल्या लॉकेटला किस का करतो?
विराट कोहली हा अनुष्का शर्मावर जीवापाड प्रेम करतो. विशेष म्हणजे त्याच्या क्रिकेटमधील यशामागे अनुष्काचा फार मोठा वाटा आहे, असे विराटने अनेकदा म्हटलेले आहे. काही वर्षांपूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात विराटनेशतक झळकावले होते. याच आनंदामध्ये त्याने गळ्यातून लॉकेट बाहेर काढून त्याचे चुंबन घेतले होते. याआधीही विराटने अशाच प्रकारे आपला आनंद साजरा केला होता. विराट कोहलीच्या गळ्यात असलेल्या या लॉकेटमध्ये त्याची वेडिंग रिंग आहे. याच लॉकेटचे चुंबन घेत विराट कोहली त्याच्या यशाचे श्रेय अनुष्का शर्माला देतो. विराट त्याच्या यशात अनुष्काचाही वाटा आहे हे मानतो त्यामुळे तो या लॉकेटला किस करतो. काल तो किती आनंदी झाला होता ते सगळ्या जगाने पाहिलं. त्यानंतर तो लॉकेटला किस का करतो हे कारण आता समोर आलं आहे.

२०१८ मध्ये पहिल्यांदा सुरु झाली लॉकेट स्टोरी
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या या लॉकेटच्या स्टोरीला २०१८ मध्ये पहिल्यांदा सुरुवात झाली. या वर्षी भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना होता. याच सामन्यात विराटने पहिल्यांदा त्याच्या गळ्यातील लॉकेट बाहेर काढून दाखवले होते आणि त्याचे चुंबन घेतले होते. त्यानंतर २०१८ भारताचा इंग्लंडविरोधात सामना होता. या सामन्यात विराटने कसोटी शतक झळकावले होते. या शतकाच्या आनंदात विराटने गळ्यातील लॉकेट बाहेर काढून त्याचे चुंबन घेतले होते. मध्यंतरीच्या काळात विराट कोहलीचा फॉर्म बिघडला होता. तो चांगल्या धावा करण्यात अपयशी ठरत होता. यानंतर नेटकरी अनुष्का शर्माला दोष देत ट्रोल करत होते. त्यामुळे सगळ्यांचे तोंड गप्प करण्यासाठी विराट कोहलीने गळ्यातील लॉकेटला किस केलं होतं असं सांगितलं जातं. तेव्हापासून विराटची शतकी खेळी किंवा चांगली कामगिरी झाली की तो या लॉकेटला किस करतो. या परंपरेत अजूनही खंड पडलेला नाही.