Kapil Dev Slams Team India Over IPL: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी आधुनिक काळातील क्रिकेटमधील दबावाला खेळाडूंनी कसे सामोरे जावे याविषयी स्पष्ट शब्दात उत्तर देत एका अर्थाने टीम इंडियाची कानउघडणी केली आहे. १९८३च्या विश्वचषकात दमदार खेळीने टीम इंडियाला जगाच्या इतिहासात पहिल्यांदा विश्वविजेता बनवणारे कपिल देव हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी मानले जातात. अनेक खेळाडू व प्रशिक्षकांच्या तुलनेत कपिल देव हे नेहमीच प्रेमळ भाषेत टीम इंडियाचे कौतुक करताना दिसून आले आहेत मात्र यावेळेस कपिल देव यांनी अगदी थेट भाष्य केले आहे.
कपिल देव म्हणतात की, “इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये खेळताना खेळाडूंवर खूप दडपण येते असं मी अनेकदा ऐकले आहे. मला एवढंच वाटत जर तुम्हाला दडपण वाटत असेल तर खेळू नका. हे इतके सोपे आहे. टीव्हीवर क्रिकेटबद्दल चर्चा ऐकताना मला अनेकदा ‘प्रेशर’ हा शब्द ऐकू येतो अशा खेळाडूंसाठी फक्त एक सल्ला आहे त्यांनी खेळू नये.”
पुढे कपिल देव यांनी उदासीनता किंवा डिप्रेशन या मुद्द्यावर भाष्य करतानाही स्पष्टोक्ती केली. ते म्हणतात “खरं सांगायचं तर मला अमेरिकन शब्द जसे की प्रेशर व डिप्रेशन हे कळतच नाही मी एक शेतकरी आहे, मला मेहनत माहित आहे. ज्याचे खेळावर प्रेम असेल त्याला कधीच दबाव वाटणार नाही. पॅशन असेल तर तुम्हाला दबाव जाणवणार नाही.
पाहा कपिल देव काय म्हणाले..
दरम्यान कपिल देव यांच्या विधानानंतर वाद होण्याची शक्यता आहे कारण अलीकडच्या काळात अनेक क्रिकेटपटू त्यांच्या मानसिक संघर्ष आणि नैराश्याबद्दल बोलण्यासाठी उघडपणे समोर आले आहेत. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनेही अलीकडेच त्याच्या खडतर अवस्थेत दबावाचा सामना करण्यासाठी संघर्ष केल्याची कबुली दिली होती.
सध्या आगामी T20 विश्वचषक 2022 च्या तयारीसाठी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्याआधी त्याने इंडियाचे सराव सत्र सुरु आहे.