Haris Rauf and Virat Kohli Viral Video: आशिया चषक स्पर्धेतील मोठ्या सामन्यासाठी भारत आणि पाकिस्तानचे संघ सज्ज झाले आहेत. श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियमवर २ सप्टेंबर रोजी दोन्ही संघ आमनेसामने येतील. याआधी भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू सरावात व्यस्त आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट कोहली आणि पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज हरिस रौफ एकमेकांची भेट घेत आहेत.
वास्तविक, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी विराट कोहली मैदानात आला आणि त्याचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज हारिस रौफशी झाला. मात्र, यावेळी दोघांची मैत्री पाहण्यासारखी होती. कोहलीने हारिस रौफला पाहताच हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. त्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली. यावेळी कोहलीच्या चेहऱ्यावर हसू स्पष्ट दिसत होते. कोहली आणि रौफ यांच्या भेटीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात विराट कोहलीने अविश्वसनीय षटकार ठोकल्यानंतर माजी भारतीय कर्णधारासह हरिस रौफची ही पहिली भेट होती. टीम इंडियाला गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात विजेतेपद मिळवता आले नसले, तरी पाकिस्तानविरुद्धचा विजय चाहत्यांच्या मनात अजूनही ताजा आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात विराट कोहलीने करिष्माई कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाला शेवटच्या चेंडूवर ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. कोहलीने ५३ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी केली होती.
या अविस्मरणीय सामन्यात कोहलीने अनेक नेत्रदीपक शॉट्स खेळले असले, तरी १९व्या षटकात हरिस रौफला मारलेला अप्रतिम षटकार क्रिकेट इतिहासातील सर्वात सुंदर शॉट्समध्ये नोंदवला गेला. कोहलीने हा षटकार हारिसच्या डोक्यावरून मारला होता. ज्याचे आयसीसीनेही कौतुक केले होते. त्याच वेळी, क्रिकेट तज्ञाने या षटकाराचे वर्णन अभूतपूर्व आणि अविश्वसनीय असल्याचे केले होते. कोहलीच्या या षटकाराने खुद्द हरिस रौफही हैराण झाला होता.