ICC Men’s Cricketer of the Year 2023 Nominees : आयसीसीने २०२३ या वर्षासाठी सर्व श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकण्यासाठी स्पर्धा करणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. भारताचा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा हे वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू होण्याच्या शर्यतीत आहेत. या दोघांशिवाय पॅट कमिन्स आणि ऑस्ट्रेलियाचे ट्रॅव्हिस हेड हेही हा पुरस्कार जिंकण्याचे दावेदार आहेत. सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूला दिली जाते.
१. ट्रेविस हेड
ट्रेविस हेड २०२३ मधील सर्वोत्तम पुरूष क्रिकेटपटू बनण्याचा दावेदार आहे, २०२३ मध्ये ३१ सामने खेळले आणि एकूण १६९८ धावा केल्या. त्याच्या धावांच्या संख्येपेक्षा या धावा कोणत्या परिस्थितीत आल्या हे महत्त्वाचे आहे. हेडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि एकदिवसीय वर्ल्ड कप फायनलमध्ये शतके झळकावून ऑस्ट्रेलियाला प्रत्येकी दोन आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात मदत केली. याशिवाय त्याने वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यातही शानदार खेळी साकारली होती.
२. विराट कोहली
भारताच्या स्टार फलंदाजासाठी २०२३ वर्ष खूप छान होते. त्याने ३५ सामन्यात २०४८ धावा केल्या. २०१९ पासून खराब फॉर्मशी झगडत असलेल्या कोहलीने यावर्षी जोरदार पुनरागमन केले. गेल्या वर्षीही त्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या, मात्र यंदा कोहलीने राज्य केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतरच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली. आशिया कपमध्येही त्याने शानदार फलंदाजी केली होती. मात्र, यंदाच्या विश्वचषकात कोहलीची सर्वोत्तम कामगिरी झाली. त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील ५० वे शतक झळकावले. तसेच एकदिवसीय विश्वचषकाक ७६५ धावा केल्या आणि टीम इंडियाला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
हेही वाचा – R Praggnanandhaa : गौतम अदाणींकडून प्रज्ञानंदचे कौतुक; म्हणाले, “भारत काय करू शकतो…”
३. रवींद्र जडेजा
जडेजाने यावर्षी ३५ सामन्यात ६६ विकेट घेतल्या आणि ६१३ धावा केल्या. दुखापतीमुळे जडेजा २०२३ च्या सुरुवातीला दुखापतग्रस्त झाला होता. मात्र, परत येताच त्याने अप्रतिम कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने चेंडू आणि बॅटने चमकदार कामगिरी केली. यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यातही तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. वनडे फॉरमॅटमध्येही जड्डूने दोन्ही विभागात चांगला खेळ केला. जडेजाने वर्ल्ड कपमध्येही उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याच्या पंजांनी भारताला सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवून दिला.
४.पॅट कमिन्स
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्ससाठी,२०२३ वर्ष दमदार होते. कमिन्स हा फारसा यशस्वी कर्णधार ठरणार नाही, असे मानले जात होते, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली कांगारू संघ प्रथम जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि नंतर एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला. दोन्ही वेळा ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत भारताचा पराभव केला. त्याचवेळी कमिन्सने यावर्षी २४ सामन्यात ४२२ धावा केल्या आणि ५९ विकेट्सही घेतल्या. वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू होण्याच्या शर्यतीत तो आघाडीवर आहे.