Virat Kohli Matches vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना ब्रिस्बेनच्या ऐतिहासिक गाबाच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. रविचंद्रन अश्विन आणि हर्षित राणा यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. रवींद्र जडेजा आणि आकाश दीप यांना संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने मैदानात उतरताच अनोखे शतक झळकावले आहे. कोहलीने हे शतक बॅटने नाही तर सामना खेळण्याच्या दृष्टीने केले आहे.
विराट कोहली त्याचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १००वा सामना आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०० किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११० सामने खेळले होते. ९१ सामन्यांसह महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा – IND vs AUS: गाबा कसोटीसाठी भारताची प्लेईंग इलेव्हन जाहीर, संघात २ मोठे बदल; हर्षित राणा-अश्विन…
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक सामने खेळलेले भारतीय खेळाडू:
सचिन तेंडुलकर- ११० सामने
विराट कोहली- १०० सामने
महेंद्रसिंग धोनी- ९१ सामने
रोहित शर्मा- ८२ सामने
रवींद्र जडेजा- ७३ सामने
ऑस्ट्रेलियाविरूद्ध ५ हजार धावा
ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली भारतासाठी दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत ५३२६ धावा केल्या आहेत, ज्यात १७ शतकांचा समावेश आहे. सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६७०७ धावा केल्या आहेत, ज्यात २० शतकांचा समावेश आहे.
हेही वाचा – VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
गाबाच्या मैदानावर खेळला जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. सामना सुरू झाल्यानंतर दोन वेळा पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. यासह १३.२ षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता २८ धावा केल्या आहेत. भारताकडून बुमराह, सिराज आणि आकाशदीप यांनी गोलंदाजी केली आहे. दुसऱ्यांदा पावसामुळे सामना थांबवण्यात आल्याने लंच ब्रेक घेण्यात आला आहे.