Kusal Mendis About Virat Kohli: क्रिकेट हा जेंटलमेन्स गेम म्हणून ओळखला जातो. विजय- पराजयाच्या पलीकडे खिलाडू वृत्ती जपणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिले जाते. त्यामुळे प्रत्येक खेळानंतर हात मिळवून प्रतिस्पर्ध्यांचे सुद्धा अभिनंदन करण्याची पद्धत आहे. मात्र जेव्हा ५ नोव्हेंबरला विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीतलं ४९वं शतक झळकावले तेव्हा श्रीलंकेच्या कुसल मेंडिसने उद्धटपणे दिलेल्या एका उत्तरामुळे क्रिकेटच्या याच खिलाडूवृत्तीवर प्रश्न निर्माण केले आहेत. विराट कोहली सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डशी बरोबरी केल्यावर भारतासह जगभरातल्या क्रीडारसिकांकडून विराट कोहलीवर स्तुतिसुमनं उधळली गेली होती पण याविषयी कुसल मेंडिसला विचारले असता त्याने, “मी का कोहलीचं अभिनंदन करू?” असे उत्तर दिले होते.
मात्र, आता मेंडिसला त्याची चूक लक्षात आली असल्याचे दिसतेय. पत्रकार परिषदेदरम्यान त्याने आपल्याला संदर्भ माहित नव्हता आणि प्रश्न न समजल्याने त्याने असे उत्तर दिले असे स्पष्टीकरण दिले आहे. ४९ एकदिवसीय शतके ठोकणे ही काही छोटी कामगिरी नाही असे म्हणत त्याने कोहलीच्या कामगिरीचे कौतुक केले व आपल्या आधीच्या कमेंटविषयी दिलगिरी व्यक्त केली.
कुसल मेंडिसने एशियन मिररच्या मुलाखतीत सांगितले की, “पत्रकार परिषदेदरम्यान, कोहलीने आपले ४९वे शतक झळकावले हे मला माहीत नव्हते, जेव्हा पत्रकाराने अचानक विचारले, मला काय बोलावे तेच कळत नाही आणि मलाही प्रश्न समजला नाही. “
हे ही वाचा<< IND vs NED: हिटमॅनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, रोहितने एका वर्षात सर्वाधिक षटकार मारत ‘या’ खेळाडूला टाकले मागे
दरम्यान, श्रीलंकेचा संघ यंदाच्या विश्वचषकात उत्तम कामगिरी करू शकला नाही आणि लीग टप्प्यातुन स्पर्धेतून बाहेर पडला. सध्या विश्वचषक स्पर्धा शेवटच्या टप्यात पोहोचली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. तर १६ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना होणार आहे. भारताने विश्वचषकात आतापर्यंत सलग आठ विजय नोंदवले आहेत. न्यूझीलंडला सुद्धा भारताने एकदा हरवले आहे पण २०१९ मधील भारताचा रेकॉर्ड पाहता, तेव्हा सुद्धा नॉक आउट सामन्यात भारताला न्यूझीलंडने स्पर्धेतून बाहेर काढले होते. भारत यंदा त्या पराभवाचे उत्तर देणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.